मुंबई : समोर मंत्री असो वा अन्य कोणी, आपली बाजू सत्याची असेल तर विजय होतोच. न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व पीडित महिलांसाठी ऐतिहासिक आहे. आता धनंजय मुंडेंचीआमदारकी घालवूनच शांत बसेन, पुढच्या सहा महिन्यांतच त्यांची आमदारकी जाईल. तो दिवस मोठा विजय असेल असे मोठे विधान करुणा शर्मा यांनी केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी धनंजय मुंडेंबद्दल काही स्फोटक दावेही केले.
मला प्रेमात अडकवून, माझ्याशी विवाह करणा-या व्यक्तीला धनंजय मुंडेंच्या दलालांनी २० कोटी रुपयांची ऑफर दिली होती असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दरमहा सव्वा लाख रुपये, तर मुलीला ७५ हजार रुपये देखभालीचा खर्च देण्याच्या वांद्रे दंडाधिका-यांच्या आदेशावर माझगाव सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.
या निकालानंतर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा यांनी खळबळजनक आरोप केले. राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर हे धनंजय मुडेंसाठी दलाली करतात, याच लोकाकडून मला धमक्याही आल्या होत्या असेही करुणा शर्मा म्हणाल्या.
हतबल झाले पण लढले
महिला या असा लढा देतानादेताना हतबल होतात. मीदेखील अनेकदा हतबल झाले, रडले. पण आपली बाजू सत्याची असेल तर आपण लढले पाहिजे, न्याय मिळतोच. या निकालाने महिलांना एक नवा मार्ग दिसला आहे. अशा अनेक महिला आहेत ज्यांच्यावर अन्याय होत आहे. पण माझ्यासारख्या एका साधारण महिलेने एका मंत्र्याला हरवले आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने लढावे असे माझे आवाहन आहे असेही त्या म्हणाल्या.
करुणा मुंडेंना अश्रू झाले अनावर
धनंजय मुंडेंनी बदनामीचा कट रचल्याचा गंभीर आरोप करताना करुणा शर्मा यांना अश्रू अनावर झाले. आपल्याला कधी जेलमध्ये पाठविण्यात आले तर कधी घरी गुंड पाठवून धमकावण्यात आले. धनंजय मुंडेंची पहिली बायको मीच आहे हे न्यायालयात दुस-यांदा सिद्ध झाले आहे. १९९८ पासून आतापर्यंत २७ वर्षे मी धनंजय मुंडे यांच्यासाठी दिली आहेत.
माझा हक्क म्हणून न्याय मिळायला हवा
आता माझा हक्क म्हणून मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी होती. धनंजय मुंडे यांच्याकडे डोकं नाही. त्यांच्या आजूबाजूच्या दलाल लोकांनी हे कटकारस्थान रचले आहे. त्यातला एक आका जेलमध्ये गेला आहे असेही करुणा शर्मा म्हणाल्या.