मुंबई : प्रतिनिधी
पत्रकार अनिल थत्ते यांच्या एका मुलाखतीचा हवाला देऊन गिरीश महाजनांचे महिला सनदी अधिका-याशी संबंध असल्याचा आरोप करून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या आरोपांवर महाजन यांनीही जोरदार उत्तर दिले आहे.
मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडले तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक नंबरचे महाचोर आहेत. कमरेखाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरे काही जमत नाही. त्यांनी एक तरी पुरावा दाखवावा, मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडेल. माझा अंत पाहू नका, असा इशारा त्यांनी एकनाथ खडसे यांना दिला.
कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलायचे असेल तर त्यांना घराबाहेर निघणं मुश्किल होईल. त्यांचे सगळे संपलेले आहे. त्यांचे दुकान बंद झालेले आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात. मी काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे.
ते नेहमी म्हणतात पुरावे आहेत, सीडी आहेत. मी वारंवार त्यांना आव्हान दिले माझी सीडी लावा. त्यांचे जावई तीन वर्ष जेलमध्ये जाऊन आले होते. त्यांच्या पत्नीला मात्र महिला आहे म्हणून आम्ही जाऊ दिले नाही. त्यांच्याबद्दल लवचिकता घेतली. विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडे बोलायचे. स्वत: नंबर एकचे महाचोर आहेत. सगळे धंदे त्यांचे लोकांना माहिती आहेत. मी जर त्यांच्याबद्दल एका गोष्टीची वाच्यता केली तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील.
ते ज्येष्ठ आहेत, वयाने मोठे आहेत, बोलताना त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावे. माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावं, जे सत्य असेल ते बोला. मात्र काही कारण नसताना लोकांना खोट्या बातम्या द्यायच्या. वारंवार ते म्हणतात माझ्याकडे हे आहे, ते आहे.. मात्र केलेले आरोपांचे पुरावे ते देत नाहीत. लोकांची दिशाभूल करतात, असे महाजन म्हणाले.
मी त्यांच्याप्रमाणे खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला कमरेखालची भाषा शोभत नाही. मी सात वेळा आमदार आहे, मंत्री आहे. त्यामुळे हे बघून त्यांचा जळफळाट होत आहे. त्यांचे खूप वाईट दिवस आले आहेत. माझा राजकीय आलेख बघून त्यांचा जळफळाट होत आहे. त्यामुळे ते वाटेल ते, बेभान वक्तव्ये करीत असतात. मला वाटतं त्यांच्याकडे एक जरी पुरावा असेल तर त्यांनी द्यावा, बडबड करू नये.
गेल्या अनेक वर्षापासून वारंवार घाणेरडी भाषा करायची. काही सिद्ध करता येत नाही. काहीतरी चारिर्त्यहणण करायचे, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेले नाही. त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडेल. अमित शहा यांना काय पुरावा दाखवता, लोकांना दाखवा. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही, मला बोलायला लावू नका, असा इशारा महाजन यांनी दिला आहे.