दिसपूर : निवडणूक कोणतीही असो, शिक्षकांना हमखास ड्युटी लावली जाते. त्याचा परिणाम अध्यापनावर होतो. पण त्यानंतरही शिक्षकांची या कामातून सुटका झालेली नाही. आता तर शिक्षकांच्या इलेक्शन ड्युटीमुळे एका राज्यात थेट परीक्षाच रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात ढकलण्यात आले आहे.
आसामधील राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पंचायत निवडणुका असून त्याचवेळेत परीक्षा आल्या आहेत. मात्र, शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने इयत्ता ११ वीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच इयत्ता १२ वीमध्ये बढती मिळणार आहे. आसाम राज्य विद्यालय शिक्षण मंडळाकडून अकरावीच्या परीक्षा घेण्यात येतात.
आसामचे शिक्षणमंत्री रनोज पेगू यांनीही या घोषणेचे समर्थन केले आहे. त्यांनी सांगितले की, अनेक शिक्षकांना इलेक्शन ड्युटी आहे. त्यामुळे शाळांमध्ये नियोजित परीक्षा सुरूच ठेवणे कठीण झाले असते. निवडणूक प्रक्रिया २० मे पर्यंत आहे. या निवडणुकीच्या प्राथमिक तयारीपासून मतमोजणीपर्यंत शिक्षकांना ड्युटी आहे.
शिक्षण मंडळाने याबाबत स्पष्ट केले आहे की, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संस्थांना परीक्षा आयोजित करणे खूप कठीण होईल. त्यामुळे निवडणुकीनंतरच परीक्षा प्रभावीपणे घेणे शक्य होईल. पण एवढ्या उशिरा परीक्षा घेणे संयुक्तिक नसल्याचे मंडळाने म्हटले आहे. मार्च २०२५ च्या परीक्षेला बसणारे इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यांना आता थेट इयत्ता बारावीत प्रवेश मिळेल. ते २०२६ मध्ये होणारी इयत्ता बारावीची परीक्षा देऊ शकतील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
परीक्षेसाठी अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच जे सेल्फ असेसमेंट करू इच्छितात, त्यांना रद्द केलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना यामाध्यमातून सराव करता येईल. दरम्यान, आसाम राज्य निवडणूक आयोगाने २७ जिल्ह्यांमध्ये दोन टप्प्यांत पंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. ता. ३ एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. तर ११ मे रोजी मतमोजणी होणार आहे.