29.9 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeराष्ट्रीयदारूबंदीनंतर उज्जैनमधील काळभैरव भोगचे नियम बदलले

दारूबंदीनंतर उज्जैनमधील काळभैरव भोगचे नियम बदलले

महाकालचा सेनापती काळभैरवला भोग म्हणून दारू कशी अर्पण करणार?

उज्जैन : मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकालचे दर्शन घेणा-यांच्या भाविकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अगदी गावागावातून महाकालचे दर्शन घेण्यासाठी युवकांचे जथ्थे उज्जैनला नेहमीच जातात. महाकालबाबाचे दर्शन घेण्यापूर्वी सेनापती काळभैरवचे दर्शन घेऊन त्याला दारूचा भोग चढवण्याची परंपरा आहे. पण उज्जैनमध्ये दारूबंदीच्या निर्णयामुळे भाविकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

भाविकांना उज्जैनमध्ये दारू मिळणार नाही. पण त्यासाठी सरकारने काही गोष्टींमध्ये सवलत दिली आहे. सरकारच्या नव्या नियमांचे पालन केल्यास भाविकांना काळभैरवला दारूचा भोग चढवता येऊ शकतो. मध्य प्रदेशमध्ये १ एप्रिलपासून १७ धार्मिक ठिकाणी दारुबंदीचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामध्ये उज्जैनचा समावेश आहे. उज्जैनच्या सीमेमध्ये दारूची विक्री करता येणार नाही. काळभैरव हे मंदिर उज्जैनच्या सीमेमध्येच येत असल्याने मंदिराच्या आवारात असलेली दारूची दुकानेही बंद करण्यात आली आहेत. असे असले तरी सरकारने बाहेरुन दारू आणून काळभैरवला भोग चढवण्यास मान्यता दिली आहे.

काळभैरवसाठी दारू बाहेरून आणता येणार
उज्जैनमध्ये जरी दारुबंदी असली तरी काळभैरवाला भोग चढवण्यासाठी मात्र भाविकांना बाहेरून दारू आणता येणार आहे. पण ही दारू आणण्याचे प्रमाण मर्यादित करण्यात आले आहे. उज्जैन शहरामध्ये लागू करण्यात आलेल्या दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उज्जैनमध्ये येणा-या सर्व मार्गांवर पोलिसांनी पहारा ठेवला असून प्रत्येकाची तपासणी केल्याशिवाय सोडले जात नाही. पोलिस प्रामुख्याने इंदूर-उज्जैन, देवास-उज्जैन, बडनगर-उज्जैन, माकसी-उज्जैन आणि आगर-उज्जैन या मार्गांवर वाहनांची तपासणी करत आहेत. ग्रामीण भागातील पोलिसांनाही त्याबाबत सतर्क करण्यात आले आहे.

काळभैरवला दारुचा भोग का चढवला जातो?
काळभैरव मंदिरात दारू अर्पण करण्यामागे अनेक प्रकारच्या श्रद्धा आहेत. राजा विक्रमादित्यच्या काळात याची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. तसेच काळभैरव हा शाक्त पंथियांचा देव असल्याचेही मानले जाते. त्यामुळेच काळभैरवाला दारुचा भोग चढवण्याचा प्रघात आहे. काळभैरव मंदिरात भोग म्हणून दारू अर्पण करण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ही दारू मूर्तीच्या समोरच्या पात्रात टाकली जाते. अनेकांचा दावा आहे की पात्रात दारू टाकल्यानंतर ते पात्र रिकामे होते. त्यामुळे ही दारू कुठे जाते याचे कोडे आजतागायत उलगडू शकलेले नाही. काळभैरवाची मूर्तीकडून या दारुचं सेवन केलं जातं असा लोकांचा दावा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR