मुंबई : प्रतिनिधी
कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांची मूळ अडचण जाणून घेण्याऐवजी शेतक-यांनाच खडे बोल सुनावले होते. त्यानंतर राज्यभरातील शेतक-यांसह राजकीय वर्तुळातून कृषिमंत्र्यांवर जोरदार टीका होत होती. यावर अखेर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त केली. कोकाटे यांनी आज नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना माझ्या वक्तव्यामुळे शेतक-यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
अनवधानाने आणि मस्करीत कुस्ती झाल्याने असे वक्तव्य केल्याचे कोकाटे म्हणाले. शेतक-यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल, भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे कोकाटे म्हणाले. गेले ८ दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाने नुकसान झाले. नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाईल, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. शेतक-यांसाठी समृद्धी आणि सुख मिळावे, अशी प्रार्थना केल्याचे कोकाटे म्हणाले.
जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावे. कर्ज घ्यायचे आणि पाच ते दहा वर्षे कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचे नाही, असे मामिकराव कोकाटे म्हणाले. तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता, त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक आहे का? असा सवालही त्यांनी केला होता.