लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात देशी गोवंश संवर्धन आणि संरक्षणासाठी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील २१ नोंदणीकृत गोशाळांपैकी ८ पात्र गोशाळांची निवड करण्यात आली असून त्या गोशाळांमधील ३ वर्षांवरील देशी गाईंना प्रतिगाई प्रतिमहा १ हजार ५०० रूपये या दराने पोषणासाठी अनुदान जाहीर करण्यात आले.
पशुसंवर्धन विभागाच्या समितीने सर्व पात्र गोशाळांची प्रत्यक्ष पडताळणी करून, पशु आधार टॅगिंगच्या माध्यमातून नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अॅपवर गोवंशाची माहिती अपलोड केली आहे. या उपक्रमाअंतर्गत १ हजार ७०५ पशुधनामधून ७०१ देशी गाईंना तीन महिन्यांचे ३१ लाख ५४ हजार ५०० रूपये इतके पोषण अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत थेट संबंधित गोशाळांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. यामुळे गोशाळा चालकांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये संपूर्ण गोवंश हत्या प्रतिबंधित असून, पोलिसांकडून पकडलेल्या गोवंशांची रवानगी अशा पात्र गोशाळांमध्ये करण्यात येते.
या पार्श्वभूमीवर गोशाळांना स्वयंपूर्ण बनविणे, शास्त्रोक्त पद्धतीने देशी गोवंशाची पैदास करणे, उच्च प्रतीच्या कालवडींचे उत्पादन करणे, तसेच गोबरगॅस, गांडुळखत, गोमूत्रावर आधारित जैविक उत्पादने निर्मितीचे प्रशिक्षण व प्रोत्साहन दिले जात आहे. गोशाळा चालक व पशुपालक यांना यासंबंधीची सविस्तर माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग व लातूर पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय एक व तालुकास्तरीय सहा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. या कार्यशाळांमध्ये तज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयांवर सखोल माहिती देऊन उपस्थितांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.