मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत मराठी भाषेच्या वापराबाबत पुन्हा एकदा वातावरण तापले असून, मनसेकडून मराठीच्या आग्रहासाठी आंदोलन सुरू आहे. मराठीत बोलण्यावरून वाद निर्माण झाल्याच्या घटना घडत असतानाच, आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (उद्धव गट) वेगळीच भूमिका घेत हिंदी भाषिकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. कांदिवली परिसरात उद्धवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांच्या वतीने ‘मिळून सारे शिकूया मराठी भाषा’ या संदेशासह बॅनर लावण्यात आले आहेत. ‘ घाबरू नका, चला मराठी बालूया’ आणि ‘हम आपको मराठी भाषा सिखाएंगे’ अशा घोषणा करत मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, या पोस्टरमधील मराठी मजकुरात व्याकरणाच्या त्रुटी आढळल्या आहेत. उदाहरणार्थ, ‘घाबरू नका’’ या वाक्यानंतर अयोग्यरित्या प्रश्नचिन्ह वापरण्यात आले आहे. तसेच, ‘चला करू या मराठी भाषेचा सन्मान’ या योग्य वाक्याच्या जागी ‘चला करूया मराठी भाषाचे सन्मान’ असे चुकीचे वाक्य छापले गेले आहे. कांदिवलीतील एअरटेल गॅलरीमध्ये मराठीत संवाद साधणा-या एका तरुणाशी कर्मचा-याने वाद घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं आणि एअरटेलला इशाराही दिला.
त्याचप्रमाणे, एका हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकाने ‘मराठी गया तेल लगाने’ असे विधान केल्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली. या प्रकारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित रक्षकाला चोप दिल्याचे वृत्त आहे. सध्या मनसेकडून विविध बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेच्या वापराबाबत निवेदनं दिली जात आहेत, मात्र काही ठिकाणी परप्रांतीय कर्मचा-यांशी वादाचे प्रसंगही समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने काँदिवली भागात ‘मराठी भाषा शिकवणी वर्ग’ सुरू करत बॅनर लावले असून, यातून मनसेच्या भूमिकेला टोला देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘मिळून सारे शिकूया मराठी’ असा संदेश देणा-या या पोस्टर्समध्ये व्याकरणाच्या काही त्रुटीही आढळून आल्या आहेत, ज्यावरून नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मराठी भाषेच्या वापराबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत मराठी भाषा आणि मराठी जनतेवरील अन्यायाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतील मुद्द्यांची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंर्त्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेचा सन्मान राखणे हे राज्य सरकारचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे नमूद करत, सामंत यांनी पुढील ८ ते १० दिवसांत सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक घेण्याची घोषणा केली. या बैठकीत मराठी भाषेच्या वापराबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.