छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडजवळील लिहाखेडी फाट्यावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला. भोकरदन तालुक्यातील अनवा गावातून नवरात्रीनिमित्त आजूबाईच्या स्वारीसाठी निघालेल्या या तरुणांवर काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातात समाधान अवचितराव आघाडे आणि काशिनाथ गोविंदा पांढरे या दोन मित्रांचा जागेवरच मृत्यू झाला, तर विकास रामभाऊ सोनवणे याने रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. हे तिघेही सिल्लोड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर दुचाकीवरून प्रवास करत होते. भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे नुकसान झाले आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिस-या जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
या घटनेची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, ट्रॅक्टर जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रॅक्टरचा वेग खूप जास्त होता आणि चालकाने वाहनावर नियंत्रण ठेवले नाही, ज्यामुळे हा अपघात घडला. मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून गावक-यांनीही संताप व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, लवकरच आरोपी चालकाला अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.