मुंबई : प्रतिनिधी
सत्ताधारी पक्षाकडून फेक नेरेटिव्ह पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. आयटीसेल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोटो, व्हीडीओ एडिट करून मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवत आहे. राज्यातील जनतेला सत्य कळावे आणि सत्ताधा-यांच्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पंधरा नेते आणि प्रवक्त्यांच्या टीमकडे जबाबदारी सोपवली आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते, विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, अॅड. यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजीत कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, चरण सिंग सप्रा हे पत्रकार परिषदा घेऊन आणि माध्यमाशी संवाद साधून काँग्रेस पक्षाची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाणार आहेत. यांच्या समन्वयाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांच्याकडे देण्यात आली आहे अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व संघटन नाना गावंडे यांनी दिली आहे.