22.3 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeराष्ट्रीयगिधाडांसह देशात विविध पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट!

गिधाडांसह देशात विविध पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट!

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या ५० वर्षांत देशातील गिघाडांसह अन्य जातींच्या पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. १९९२ ते २०२२ या काळात पांढ-या रंगाच्या गिधाडांची संख्या ९८ टक्क्यांनी आणि भारतीय गिधाडांसह सडपातळ गिधाडांची संख्या ९३ टक्क्यांनी कमी झाली आहे, अशी धक्कादायक माहिती लिव्हिंग प्लॅनेट अहवाल २०२४ मधून समोर आली आहे.

देशातील विविध जातींच्या पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. या अहवालात भारतातील पक्ष्यांची स्थिती आणि संख्येविषयी वेगळा विभाग करण्यात आला. लिव्हिंग प्लॅनेट अहवाल २०२४ मधील माहितीनुसार १९८० च्या तुलनेत २०२४ मध्ये देशातील पक्ष्यांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. प्रामुख्याने जनावरांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणा-या डायक्लोफेनाक, एसेक्लोफेनाक, केटोपोर्फेन आणि नाइमसुलाइड औषधांमुळे गिधाडांच्या संख्येत घट होत आहे.

पशुवैद्यक आणि पशुपालकांमध्ये या औषधांबाबत व्यापक जागृती करूनही गिधाडांचा -हास रोखता आला नसल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे. देशाच्या कानाकोप-यात पसरलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहक तारांच्या जाळ््याचाही विपरीत परिणाम होताना दिसत आहे. विजेचा धक्का लागून अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे.

लिव्हिंग प्लॅनेट अहवाल २०१६ नुसार जगातील २२ देशांमध्ये गवताळ कुरणांचा -हास झाल्यामुळे फुलपाखरांच्या एकूण प्रजातींपैकी ३३ टक्के प्रजातींमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. ओडिशातील मधमाश्यांच्या संख्येत ८० टक्क्यांनी घट झाली आहे. पर्यावरणाचा वेगाने -हास होत असल्याचा थेट परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर दिसून येत आहे. देशांतील पक्ष्यांच्या संख्येत घट झाली आहेच. त्या शिवाय देशात येणा-या स्थलांतरीत पक्ष्यांच्या संख्येतही घट दिसून येत आहे. पक्ष्यांच्या संख्येतील घट हे गभीर संकट म्हणून समोर आले आहे. तातडीने एकात्मिक उपाययोजनांची गरज आहे, असे मत इला फाउंडेशनचे संचालक, पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले.

पशुधनाच्या उपचारासाठी वापरली जाणारी औषधी गिधाडांसाठी अत्यंत घातक असून, या औषधांमुळे गिधाडांसह विविध पक्ष्यांच्या जाती नष्ट होत आहेत. याशिवाय उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांच्या धक्क्यामुळेही पक्ष्यांची जीवित हानी मोठी प्रमाणात होते. गवताळ कुरणे, पाणथळ ठिकाणे, जंगले कमी झाल्यामुळे पक्षी, जंगली जनावरांच्या नैसर्गिक अधिवासाचा -हास झाला आहे. तसेच ओडिशामध्ये याच कारणामुळे २००२ पासून मधमाश्यांच्या संख्येत ८० टक्के घट घट झाली आहे. एकूणच पर्यावरणाच्या -हासामुळे जैवविविधता नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नैसर्गिक आधिवासाच्या -हासाचा बसतोय फटका
वाढते शहरीकरण, नागरीकरण आणि शेतीसाठी गवताळ कुरणे, झुडपांची कुरणे, जंगले आणि पाणथळ जांगाचा -हास होत असल्याने पक्ष्यांच्या नैसर्गिक आधिवासाचा -हास होत आहे.

प्रमुख भक्ष्य असलेल्या किटकांच्या संख्येत घट
देशातील बहुपीक पद्धतीचा वेगाने -हास होत आहे. नगदी पिकांची लागवड वाढली आहे. त्यामुळे पक्ष्यांचे भक्ष्य असलेल्या किटकांची संख्या वेगाने कमी होत आहे. खाद्यांचा अभाव हेही पक्ष्याची संख्या वेगाने कमी होण्याचे किंवा पक्ष्यांनी स्थलांतर करण्याचे प्रमुख कारण आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR