मुंबई : वृत्तसंस्था
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या बायोपिकची घोषणा झाली आहे. युवराजने कर्करोगाशी झुंज देत विश्वचषक खेळून भारताला विश्वविजेता बनवण्यात मोलाचा मोठा वाटा उचलला होता. यानंतर त्याने कर्करोगावर मात करून पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन केले होते. युवराजचा हा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर पहावयास मिळणार आहे. हा बायोपिक टी-सीरिजच्या बॅनरखाली तयार होणार असून, भूषण कुमार आणि रवी भागचंदका या बायोपिकची निर्मिती करणार आहेत.
२०११ च्या विश्वचषकादरम्यान युवराज सिंगला कर्करोग झाला होता आणि तरीही त्याने हार मानली नाही, त्याने संपूर्ण विश्वचषक खेळला होता. त्याने या स्पर्धेत दमदार कामगिरी करत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा किताब मिळाला होता. युवराज सिंगच्या या बायोपिकमध्ये त्याची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही. दरम्यान, युवराज सिंगने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की, जर त्याच्यावर बायोपिक बनवला गेला तर त्याची भूमिका सिद्धांत चतुर्वेदीने साकारावी अशी त्याची इच्छा आहे.
युवराज सिंगची क्रिकेट कारकीर्द
युवराज सिंग हा भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. तो १७ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. या कालावधीत त्याने ४० कसोटी सामन्यांमध्ये ३३.९३ च्या सरासरीने १९०० धावा केल्या. ३०४ एकदिवसीय सामन्यांत ३६.५६ च्या सरासरीने ८७०१ धावा आणि ५८ टी-२० सामन्यांत २८.०२ च्या सरासरीने ११७७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ७१ अर्धशतके आणि १७ शतके झळकावली आहेत.