सोलापूर : प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने आणि शाळेच्या संस्थापकाने तुझ्यामुळे आमचे नाव खराब होते असे म्हणून त्या मुलीला शाळेत येण्यास प्रवेशबंदी केल्याने एका मुलीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. याची माहिती अशी की, शिवशाही शंकर नगरातील अस्मिता – मल्लिनाथ कोळी (वय १९) हिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. तिचे दर्शन आगरखेड या मुलासोबत प्रेम संबंध होते. परंतु, दर्शन याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. तुझ्यासोबत लग्नही करत नाही आणि तुझी बदनामी करतो. तुझे जगणे मुश्किल करून टाकीन अशी धमकीही दर्शनने दिली होती.
तसेच अस्मिता ज्या शाळेत शिकत होती, त्या शाळेचे संस्थापक धऱ्याप्पा हत्तुरे, सुधाकर कामशेट्टी आणि दर्शनचे वडील आगरखेड यांनीही अस्मिताचे वडील मल्लिनाथ यांना तुमच्या मुलीला शाळेतून काढून टाकतो अशी धमकी दिली होती. शिवाय तिला हत्तुरे वस्तीतील मल्लिकार्जुन प्रशाला येथे येण्यास प्रवेश बंदी केली होती. या सर्व त्रासातून अस्मिता हिने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अस्मिताचे वडील मल्लिनाथ कोळी (४५) यांनी या चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक साळुंखे करत आहेत. अस्मिता ही मागच्या काही दिवसांपासून तणावाखाली होती. तिच्या आत्महत्येनंतर दाखल गुन्ह्यांनसार पोलिस तपास करीत आहेत. तपासातून अधिक माहिती समोर येईल, असे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.