26.3 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeमहाराष्ट्ररुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाडांविरोधात ट्विट करणे भोवले

बीड : प्रतिनिधी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर द्या, असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला होता. आता जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात रुपाली ठोंबरेंची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल होत आहे. याबाबत स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट करत सदर चॅट खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.

दरम्यान,
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरून सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरांवरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले होते.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ट्विट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचा फोटो असलेले चॅट एक्सवर पोस्ट करत आव्हाड कशाप्रकारे समाजा-समाजात तेढ निर्माण करतात हे दाखवण्याचा रुपाली ठोंबरे यांचा प्रयत्न असल्याचे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. रुपाली ठोंबरे यांच्यासह विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे, सौरभ आघाव यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्याच माणसाला तयार ठेव शिवराज..मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे…मुंडेंविरोधात आणि वाल्या (वाल्मिक कराड) विरोधात जे जे असेल सर्व गोळा कर.. पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव….तुझा फोन लागत नाहीय. सकाळपासून प्रयत्न करतोय, असा मेसेज आहे. तसेच मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आले तर करा, पैशांची काळजी करू नका, आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्यालाही संधी द्यावी, मी सांगितलं आहे, कसं काय कुणावर बोलायचे कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता..असेही व्हायरल होणा-या चॅटमध्ये म्हटलं आहे.

व्हायरल चॅटवर आव्हाडांची प्रतिक्रिया
माझी खोटी व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल करणा-यांविरुद्ध मी काल बीडमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला. कर नाही तर डर कशाला?, असे जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट करत म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा आहे, याची संपूर्ण माहिती मी ट्वीटद्वारे दिली आहे. त्याचा वापर केला तर पोलिसांना, ‘ चौकशी सुरू आहे’, हे सांगण्याचे कारणच उरणार नाही. मी स्वत:च सर्व तांत्रिक बाबी माझ्या ट्वीटमध्ये सांगितलेल्या असून या माहितीचा वापर केला तर पोलिसांना फक्त कारवाईच करायची आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR