19.4 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रमुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेविरोधात जमाव गोळा करणा-यांवर गुन्हा दाखल

मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेविरोधात जमाव गोळा करणा-यांवर गुन्हा दाखल

मुंबई : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांना मुंबईतून अटक करण्यात आल्यानंतर अटकेला विरोध करण्यासाठी घाटकोपर पोलिस ठाण्यात जमाव जमावणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने १६ जणांविरोधात दगडफेक करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व बेकायदेशीर जमाव गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. अझहरी यांच्या अटकेबाबत समजताच त्यांच्या समर्थकांनी घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. बारा तासांहून अधिक वेळ पोलिस ठाण्याबाहेर समर्थक जमले आहेत.

जुनागड न्यायालयाजवळील नारायण विद्या मंदिराच्या मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात अझहरी यांनी ३१ जानेवारी रोजी वादग्रस्त भाषण केले होते. त्याची चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित होताच कारवाईची मागणी वाढली. जुनागड पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक मुहम्मद युसूफ मलिक, अझीम हबीब ओडेदारा आणि मुफ्ती सलमान अझहरी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. गुजरात पोलिसांनी दोघांना अटक करत अझहरी यांचा शोध सुरू केला. त्यांच्या अटकेसाठी रविवारी एटीएस पथक घाटकोपरमध्ये दाखल झाले. मुंबई एटीएसच्या मदतीने अझहरी यांना ताब्यात घेत रविवारी घाटकोपर पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्यांना अटक दाखवण्यात आले आहे.

पोलीस कारवाईसाठी आल्याचे समजताच अझहरी समर्थकांनी पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच कारवाईला विरोध करत घोषणाबाजी केली. अझहरी यांनी त्यांना पोलिसांना सहकार्य करण्याची मागणी केली. सध्या त्यांचे शेकडो समर्थक पोलिस ठाण्याबाहेरच ठिय्या करून आहेत. पोलिस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री दहा वाजले तरी समर्थक पोलिस ठाण्याबाहेरच थांबले. त्यांनी अटकेला विरोध केला, पोलिसांवर दगडफेक केली. सीसीटीव्हीच्या मदतीने रविवारी मध्यरात्री अखेर याप्रकरणी १६ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR