पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक वाद निर्माण झाले. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला अंतिम सामन्यात अपात्र केल्याचे प्रकरण अद्याप सुरू असून, त्यावर आज निर्णय होणार आहे.दरम्यान, अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्डन चाइल्स ही देखील ऑलिम्पिक स्पर्धेतील खराब नियमांचा बळी ठरली आहे. विनेश फोगटप्रमाणेच, हे प्रकरण देखील सीएएसपर्यंत पोहोचले आहे. अवघ्या ४ सेकंदांच्या विलंबामुळे जॉर्डन चाइल्सकडून पदक हिसकावण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलांच्या जिम्नॅस्टिक्समधील फ्लोर एक्झरसाईज स्पर्धेत रोमानियाच्या अना बाबोर्सू हिला कांस्यपदक विजेते घोषित करण्यात आले. मात्र अमेरिकन गोटातून या निर्णयाविरोधात तातडीने अपील केले. तपासाअंती तेथे उपस्थित पंचांनी अमेरिकन अॅथलीट जॉर्डन चिलीसचा स्कोअर ०.१ ने वाढवला होता. हे तिला कांस्यपदक मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरले. परंतु रोमानियाच्या वतीने सीएएसमध्ये खटला दाखल करण्यात आला.
प्रकरण सीएएसपर्यंत पोहोचल्यानंतर तेथे बराच वेळ सुनावणी चालली. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॅम्पने केलेले अपील १ मिनिट आणि ४ सेकंदांनंतर आले होते. तर आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशनच्या नियमांनुसार, खेळाडू आणि त्यांच्या संघाला एका मिनिटात अपील करावे लागते. अपीलमध्ये अवघ्या ४ सेकंदांच्या विलंबामुळे, सीएएसने जॉर्डन चाइल्सकडून पदक हिसकावून घेतले आणि रोमानियाच्या अना बाबोर्सूला कांस्यपदक विजेते घोषित केले.