23.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeराष्ट्रीयचेंगराचेंगरीनंतर काही तासांनी दुसरी चेंगराचेंगरी

चेंगराचेंगरीनंतर काही तासांनी दुसरी चेंगराचेंगरी

जेसीबीने हटवला कपड्यांचा ढिगारा

प्रयागराज : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात २९ जानेवारी रोजी पहाटे २ वाजता त्रिवेणी संगमच्या काठावर चेंगराचेंगरी झाली. ज्यामध्ये ३० जणांचा मृत्यू झाला. तर ६० पेक्षा अधिक भाविक जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. कुंभमेळा प्रशासनाने तब्बल २० तासांनी मृतांची आकडेवारी जाहीर केली होती. मात्र आता मात्र या चेंगराचेंगरीनंतर अवघ्या काही तासांतच दुसरी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

संगमाच्या टोकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर दुस-यांदा चेंगराचेंगरी झाल्याचे म्हटले जात आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला बुधवारी मौनी अमावास्येसाठी संगमावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यात ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली. मध्यरात्री दुर्घटना घडून गेल्यानंतर संध्याकाळी आकडेवारी समोर आल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली. दुसरीकडे आता महाकुंभमेळ्यात आणखी एक चेंगराचेंगरीची घटना झाल्याचे समोर आले आहे.

उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दुस-यांदा झालेल्या चेंगराचेंगरीच्या ठिकाणी विखुरलेले कपडे आणि चपलांच्या ढिगा-यांमुळे मोठी दुर्घटना झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र तिथल्या मृत आणि जखमींच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेलं नाही. मात्र, या चेंगराचेंगरीत अनेकांना जीव गमवावा लागल्याचा दावा केला जात आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने चेंगराचेंगरीच्या ठिकाणावरुन कपडे, बूट आणि बाटल्यांचे ढीग हटवण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की लोक खाली चिरडले गेले आणि नंतर तिथून मृतदेह बाहेर काढले आहेत.

दुस-यांदा घडलेली चेंगराचेंगरीची घटना झुंसी येथे घडली. झुंसी हे संगमाच्या ठिकाणापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. गंगा नदीच्या उत्तरेकडील तीरावर असलेल्या झुंसी मार्गेही संगमाच्या ठिकाणी पोहोचता येते. पहाटे दोनच्या सुमारास पहिली चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर झुंसी येथे सकाळी सहाच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. तिथे मृतदेह पडले होते आणि कोणीही त्यांना विचारत नव्हते. सकाळी गुदमरून मृत्यू झालेल्या लोकांना दुपारी दीड वाजेपर्यंत रुग्णालयात नेले जात होते. चेंगराचेंगरीनंतर चार तासांनी एक महिला कॉन्स्टेबल आली. पोलिस लोकांना व्हीडीओ बनवण्यापासून रोखत होते, असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

महाकुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक अजूनही स्रान करण्यासाठी आले असल्यामुळे आणि दहशत पसरू नये म्हणून दुस-या चेंगराचेंगरीबद्दल माहिती देण्यात आली नसल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, स्रानासाठी गर्दी इतकी मोठी होती की सर्वांच्या पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली. लोकांनी बॅरिकेड्स तोडण्यास संगमावर जाण्यास सुरुवात केली. मात्र काही भाविक तिथेच झोपले होते. मोठ्या प्रमाणात गर्दी आल्याने झोपलेल्या भाविकांवर काही लोक पडले आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR