28.8 C
Latur
Wednesday, January 1, 2025
Homeअंतरराष्ट्रीयलँडिंग करताच उडाला आगीचा भडका

लँडिंग करताच उडाला आगीचा भडका

टोरंटो : दक्षिण कोरियामध्ये धावपट्टीवर उतरनाता विमान घसरून १७९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कॅनडामध्ये मोठा विमान अपघात टळला आहे. एअर कॅनडाचे विमान एसी२२५९ शनिवारी रात्री कोसळण्यापासून थोडक्यात बचावले. विमानाचा लँडिंग गिअर तुटल्याने हे विमान धावपट्टीवर घसरत त्याच्या काही भागाला आग लागली. मात्र विमानतळावरील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने वेगाने मदतकार्य करत विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले.

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एअर कॅनडाचे हे विमान सेंट जॉन येथून हेलिफॅक्स येथे जात होते. दरम्यान, लँडिंग गिअर तुटल्याने हेलिफॅक्स विमानतळावर हा अपघात झाला. त्यानंतर विमानतळावर एकच धावपळ उडाली. आता घटनास्थळावरील काही व्हीडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये विमानाचे पंख रनवेवरून घासत जाताना दिसत आहेत. त्यानंतर विमानाला आग लागल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती. मात्र अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच सर्व प्रवाशांना वाचवण्यात आले.

आता या दुर्घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून विमानाला झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, या अपघातापूर्वी काही तास आधी दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावरही एक मोठा विमान अपघात झाला. या अपघातात विमानाचा लँडिंग गिअर न उघडल्याने स्फोट झाला आणि हे विमान धावपट्टीवरून घसर जाऊन एका भिंतीवर आदळले. या आपघातात विमानामधील १८१ पैकी १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर केवळ २ प्रवासी बचावले.

एकापाठोपाठ एक झालेल्या या विमान अपघातांमुळे विमानांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच भविष्यात असे अपघात रोखण्यासाठी विमान कंपन्यांना विमानांच्या सुरक्षेबाबतचे नियम अधिक कठोर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR