23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयरेल्वेच्या अवस्थेवरून खरगेंकडून प्रश्नांची सरबत्ती

रेल्वेच्या अवस्थेवरून खरगेंकडून प्रश्नांची सरबत्ती

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी रेल्वेच्या दुरवस्थेवरुन भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने रेल्वेची आर्थिक हानी केली, रेल्वेची सुरक्षा, सामर्थ्य आणि कार्यक्षमता नष्ट करुन रेल्वेची नासधूस केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, काँग्रेसचे सरकार आल्यावर भारताचे विकास इंजिन म्हणून रेल्वेचे पुनरुज्जीवन करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणतात, नरेंद्र मोदींच्या राजवटीत रेल्वे उद्ध्वस्त झाली. सरकारने रेल्वे गाड्यांना स्वत:च्या प्रचाराचे साधन बनवले. रेल्वे आजही करोडो भारतीयांची जीवनवाहिनी आहे, पण मोदींच्या राजवटीत तिची अवस्था बिकट होत आहे. कॅग-२०२३ चा हवाला देऊन ते म्हणाले की, वेळेवर धावणा-या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांची संख्या २०१२-१३ मधील ७९ टक्क्यांवरून २०१८-१९ मध्ये ६९.२३ टक्क्यांवर आली. ५८,४५९ कोटी रुपयांपैकी केवळ ०.७ टक्के निधी ट्रॅकच्या नूतनीकरणासाठी खर्च केला जातो.

यामुळेच वंदे भारत हायस्पीड ट्रेनचा सरासरी वेग ताशी १८० किमी ऐवजी केवळ ८३ किमी प्रतितास आहे.
२०३१ पर्यंत ७५० रेल्वे स्थानकांपैकी ३० टक्के आणि सर्व मालगाड्यांचे खासगीकरण केले जाणार. सर्व नफा कमावणा-या एसी कोचचेही खासगीकरण केले जाईल. रेल्वेकडे फक्त तोट्यात असलेल्या द्वितीय श्रेणीच्या प्रवासी गाड्या उरल्या आहेत, असा दावाही खरगेंनी यावेळी केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारला सात प्रश्नही विचारले.

काय आहेत खरगेंचे प्रश्न?
– भाजप सरकारने रेल्वेतील ३ लाखांहून अधिक रिक्त जागा का भरल्या नाहीत?
– प्रति किलोमीटर प्रति प्रवासी सरासरी भाडे २०१३-१४ (यूपीए) मधील ०.३२ वरुन २०२३ मध्ये ०.६६ पैसे का झाले?
– २०१७ ते २०२१ दरम्यान ट्रेनशी संबंधित १००,००० पेक्षा जास्त मृत्यू नोंदवले गेले, हे खरे नाही का?
– कोव्हिड महामारीच्या काळात मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठीच्या सवलती का रद्द केल्या?
– कॅगनुसार, ५८,४५९ कोटींपैकी फक्त ०.७% निधी ट्रॅक नूतनीकरणासाठी खर्च करण्यात आला. का?
– रेल्वे अर्थसंकल्प विलीन करुन मागच्या दाराने निधी कमी करण्याच्या हालचाली झाल्या, हे खरे नाही का?
– मोदी सरकारने भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाची एक भव्य योजना सुरू केली आणि वाढीव खासगीकरण आधीच सुरू झाले, हे खरे नाही का? असे प्रश्न खरगे यांनी मोदी सरकारला विचारले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR