22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरवडापूर बॅरेजसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित

वडापूर बॅरेजसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित

सोलापूर : भीमा नदीवरील वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथे बॅरेज बांधला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील दीड हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळणार आहे. दोन वर्षांपूर्वी बॅरेज उभारणीला प्रशासकीय मान्यता मिळाली, पण पूर्वीच्या आराखड्यात बदल करून नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने त्याची पडताळणी करून तो प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठविला आहे. आता तो प्रस्ताव शासनाला जाईल. त्यासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

जिल्ह्यातील भीमा, सीना व माण नदीवर प्रत्येकी २४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्या सर्व बंधाऱ्यांचा सर्व्हे झाल्यावर कोणत्या ठिकाणी बॅरेजची गरज आहे, ही माहिती समोर येईल. पण, अद्याप बंधाऱ्यांच्या सर्व्हेला देखील मान्यता मिळालेली नाही. दरम्यान, भीमा नदीवरील वडापूर येथे बॅरेजसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या बॅरेजमुळे तालुक्यातील अंदाजे दीड हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

वडापूर बॅरेजसाठी ७५ कोटी रुपयांचा निधी लागणार असून त्या प्रस्तावाची पडताळणी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने नुकतीच केली आहे. त्यांच्याकडून तो प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठविण्यात आला असून प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून तो प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाला सादर केला जाणार आहे. शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर वडापूर बॅरेज उभारणीला सुरवात होईल, अशी माहिती जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सीना नदीवरील शिरापूर, बोपले (ता. मोहोळ) व रिधोरे (ता. माढा) येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यातून अंदाजे चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. तिन्ही ठिकाणचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्याचा प्रकल्प अहवाल देखील तयार करण्यात आला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात बंधाऱ्यातून वाहून जाणारे पाणी बॅरेजमध्ये अडवून त्या परिसरातील शेतीला आधार देण्यासाठी प्रशासकीय मान्यता जरुरी असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR