पुणे : प्रतिनिधी
मुळा-मुठा नदीलगतच्या नाईक बेटजवळ गेल्या आठवड्यात मृत माशांचा खच पडला होता. त्याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिकेने तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये प्रदूषणामुळे मासे मृत्य झाल्याचे समोर आल्याने ‘एमपीसीबी’ने पुणे महापालिकेला याविषयी नोटीस बजावली आहे.
पुणे महापालिकेच्या वतीने दररोज सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जाते. ज्या ठिकाणी मासे मृत झाले त्याच्याशेजारीच एक नायडू एसटीपी प्लांट आहे. तेथील घाण पाण्यामुळेच हे मासे मृत झाले, याबाबतचा अहवाल देखील मिळाला आहे. सर्व प्रकाराबद्दल ‘एमपीसीबी’ने महापालिकेला योग्य त्या दक्षता घ्याव्यात, असे आदेश नोटीशीमध्ये दिले आहेत. पुणे महापालिकेकडून दररोज ९० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडले जाते. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नदी परिसराची मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिका-यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्या वेळी नदीच्या दोन्ही बाजूंना मृत मासे पहायला मिळाले.