पुणे : हडपसर भागातील क्रोमा मॉलजवळ भरधाव इलेक्ट्रिक पीएमपीएल बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र, चालकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. भेकराईनगर ते धायरी मार्गावर निघालेल्या बससोबत ही घटना घडली. गुरुवारी रात्री हा प्रकार काळूबाई मंदिर परिसरात घडला. बसच्या पाठीमागील बाजूस धूर निघाल्याने ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भेकराईनगर आगारातील बस सायंकाळी भेकराईनगर ते धायरी या मार्गावर निघाली होती. काळूबाई मंदिर परिसरात आल्यानंतर बसच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कॉम्प्रेसरमधून अचानक धूर येऊ लागला. हे लक्षात येताच चालक, वाहकांनी बसमधील अग्निशमन विरोधी यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान चालक-वाहकांनी बसमधील नागरिकांना खाली उतरविले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने बसने पेट घेतला. त्याक्षणी अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, घटनेत कोणीही जखमी नसल्याची माहिती पीएमपीएल प्रशासनाने दिली आहे.