27.1 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeक्रीडापाकचा लाजिरवाणा पराभव

पाकचा लाजिरवाणा पराभव

पाकिस्तान ठरला ५५६ धावा करूनही हरणारा जगातला पहिला संघ इंग्लंडचा विक्रम

इस्लामाबाद : इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. दोघांनी वन डे स्टाईल फलंदाजी करताना ४५४ धावांची विक्रमी भागीदारी केली. रूटच्या २६२ धावा आणि ब्रूकच्या ३१७ धावांच्या खेळीने इंग्लंडला ७ बाद ८२३ धावांचा डोंगर उभा करून दिला. पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावा करूनही इंग्लंडने जबरदस्त पलटवार केला आणि २६७ धावांची आघाडी घेतली.

पाकिस्तानचा दुसरा डाव चौथ्या दिवशी गडगडला आणि सहा विकेट्स पडल्याने डावाने पराभव टाळण्याची त्यांची धडपड सुरू झाली.पण, त्यांना अपयश आले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात पाचशे धावा करूनही पराभूत होणारा पाकिस्तान हा पहिला संघ आहे.

अब्दुल्लाह शफिक ( १०२), शान मसूद ( १५१) व सलमान आघा ( १०४*) यांच्या शतकांनी पाकिस्तानला पहिल्या डावात ५५६ धावांपर्यंत पोहोचवले. पण, सपाट खेळपट्टीवर इंग्लंडकडूनही पलटवार होईल, हे अपेक्षित होतेच.. जो रूट व हॅरी ब्रूक यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचे कंबरडे मोडले. झॅक क्रॉली ( ७८) व बेन डकेट ( ८४) यांच्यानंतर रूट व ब्रूक यांनी मोर्चा सांभाळला. रूटने ३७५ चेंडूंत १७ चौकारांच्या मदतीने २६२ धावा केल्या आणि ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. ब्रूकने ३२२ चेंडूंत २९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ३१७ धावांची वादळी खेळी केली. त्याने कसोटीतील पहिल्या द्विशतकाचे त्रिशतकात रुपांतर केले. इंग्लंडने पहिला डाव ७ बाद ८२३ धावांवर घोषित केला.

दडपणाखाली गेलेल्या पाकिस्तानने दुस-या डावात विकेट फेकल्या.किंग बाबर आजम पुन्हा एकदा ( ५) अपयशी ठरला. गस अ‍ॅटकिन्सन आणि ब्रेडन कार्स यांनी चौथ्या दिवशी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ख्रिस वोक्स व जॅक लीच यांच्या प्रत्येकी १ विकेटने पाकिस्तानची अवस्था ६ बाद ८२ धावा केली. पण, सलमान आघा व आमेर जमाल ही जोडी मैदानावर उभी राहिली आणि शतकी भागीदारी करून संघासाठी लढली. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जॅक लिचने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. सलमान आघाला(६३) पायचीत करून जमालसोबतची १४६ चेंडूंत १०९ धावांची भागीदारी लिचने तोडली. त्यानंतर शाहिन शाह आफ्रिदीला ( १०) कॉट अँड बोल्ड आणि नसीम शाह ( ६) यांना बाद करून लिचने पाकिस्तानला नमवले. अब्रार अहमद जखमी असल्याने मैदानावर आला नाही आणि पाकिस्तानचा डाव २२० धावांवर गडगडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR