22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी पंतप्रधान कमी अन् प्रचारक जास्त

मोदी पंतप्रधान कमी अन् प्रचारक जास्त

नागपूर : मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकामागून एक होणा-या महाराष्ट्र दौ-यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदींवर टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला ४० जागांवर विजय मिळत आहे. त्यामुळेच मोदींचे दौरे सुरू झाले आहेत. नरेंद्र मोदी प्रचारक असल्यामुळे ते पंतप्रधान कमी असल्याचा खोचक टोलाही पटोले यांनी लगावला आहे.

अजित पवारांकडून सतत शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला जात असून, यावर बोलताना पटोले म्हणाले की, अजित पवारांनी मोदींचे सुद्धा वय विचारले पाहिजे. मग त्यांची हिंमत दिसेल. सोशल मीडियावर फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. गिरीश महाजन आणि अजित पवार यांची काय हालत करून ठेवली त्या व्हीडीओत पाहायला मिळत आहे. अजित दादांनी आपल्या काकांचे वय विचारण्यापेक्षा मोदी साहेबांचे वय विचारले पाहिजे, असे पटोले म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया…
गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार गटाचे आमदार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असून, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, जितेंद्र आव्हाड काय बोलले हे मला माहिती नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित लोकांना प्रवाहात आणले, त्यांनी संविधानात व्यवस्था निर्माण केली आहे. बाबासाहेबांचे हे उपकार कोणालाही नाकारता येणार नाहीत, असे पटोले म्हणाले आहेत.

अयोध्येत होणा-या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बंदी घालण्यासाठी मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर बोलताना पटोले म्हणाले की, आम्हाला यावर कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. आमचे धर्मगुरू शंकराचार्य यांनी मत मांडले आहे. धर्माचे रक्षण करणे हे काम धर्मगुरूंचे असते. कुठल्या पक्षाचे नाही. राम मंदिराचे काम अजूनही अर्धवट आहे. मंदिर वही बनायेंगे म्हणत देशात उद्रेक निर्माण करणा-या भाजपने चार किलोमीटरवर भगवान श्रीरामाचे मंदिर बांधले. भाजपला भगवान श्रीरामांना राजकारणात आणायचे होते असा आरोप पटोले यांनी केला आहे.

रामाचा फक्त भाजपलाच ठेका?
अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यातील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडून नागरिकांना घरोघरी जाऊन दिवे वाटप करण्यात येत आहेत. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, आमचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे, ज्या-ज्या धर्मातले राजकीय नेते आमच्या पक्षात येतील त्यांना त्यांच्या धर्माचे काम करायला विरोध नाही. रामाचा फक्त भाजपलाच ठेका दिलाय असे त्यांचे वरिष्ठ नेते बोलत आहेत. यावरून त्यांचा घमंड वाढलेला असल्याचा दिसून येत असल्याचे, पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR