भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील पिथमपूर औद्योगिक परिसरात एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या १२ हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ज्या कारखान्यात आग लागली ती पाईप फॅक्टरी असून, सकाळी सात वाजता ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. फॅक्टरीत ठिकठिकाणी पाईप ठेवण्यात आल्याने आगीने उग्र रूप धारण केले आहे. यामुळे १० किलोमीटर अंतरावरून देखील धुराचे लोट दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिग्नेट पीव्हीसी कारखान्यात ही आग लागली. येथील कर्मचा-यांची कामाची शिफ्ट सकाळी आठ वाजता सुरू होते. तर आग सकाळी सातच्या सुमारास लागली. त्यामुळे कारखान्यात कोणीही उपस्थित नव्हते, यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा हजर असून, त्यांच्यासोबत धार, पिथमपूर, इंदूर आणि बदनावर येथून अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.