नवी दिल्ली : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्मारकाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय स्मारक संकुलात म्हणजेच राजघाट संकुलात आता प्रणव मुखर्जी यांचे स्मारक होणार आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि बाबांच्या स्मारकाच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
यासोबतच शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान मोदींसोबतची भेट फोटो आणि केंद्रीय शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालयाचे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांनी लिहिले आहे की बाबा म्हणायचे की एखाद्याला राज्य सन्मान मागू नये, तर तो स्वत: देऊ केला जातो. पंतप्रधान मोदींनी बाबांच्या स्मरणार्थ आणि आदरापोटी हे केले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मात्र, बाबांना काही फरक पडत नाही कारण ते या जगात नाहीत आणि ते स्तुती किंवा टीकेच्या पलीकडे आहेत पण त्यांची मुलगी असल्याने मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.
प्रणव मुखर्जी जुलै २०१२ ते जुलै २०१७ पर्यंत देशाचे राष्ट्रपती होते. २०१९ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर काँग्रेस कार्यकारिणीने बैठक घेऊन त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला होता आणि त्यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता, तेव्हा शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही प्रश्न उपस्थित केला होता की, त्यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. वडिलांचे निधन, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक का बोलावली नाही आणि ठराव का मंजूर झाला नाही? असे त्यांनी काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केले होते.