मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्यांचा फोन आला होता. माझ्यासोबत ८ आमदार असून उद्धव ठाकरेंची जाहीर माफी मागून परत यायला तयार आहोत असे त्यांनी सांगितले. पण उद्धव ठाकरे यांनी, आम्ही तुम्हाला माफ करु शकत नाही, असे सांगून त्यांना परत घेण्यास नकार दिल्याचा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली आहे. यातच आदित्य ठाकरे यांनी आज मोठा दावा केला. शिवसेना शिंदे गटातील एक मंत्री आणि ८ आमदार परत यायला उत्सुक होते. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असा फोन त्यांनी केला होता. पण आम्ही तुम्हाला माफ करू शकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
अनेक जण पक्ष बदलतात, विचारधारा बदलतात, पण यांनी पक्ष फोडला, पक्षाचे नाव आणि चिन्हही चोरले आहे. ते आजही माझ्या आजोबांचे फोटो वापरतात, त्यामुळे त्यांना क्षमा नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.