नांदेड : प्रतिनिधी
नांदेड शहरातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकणा-या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर संतप्त नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जाब विचारत क्लासमध्ये घुसून तोडफोड केली.
या घटनेचा व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. या प्रकरणात शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जिजाई कोचिंग क्लासमधील शिक्षक नागेश जाधव याने अल्पवयीन मुलीला पेपर देण्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलविले होते. या ठिकाणी शिक्षक जाधव याने मुलीशी अश्लील चाळे केले. ही बाब काही कार्यकर्त्यांना समजल्याने त्यांनी कोचिंग क्लास गाठत शिक्षकांना जाब विचारला. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी क्लासमध्ये तोडफोड केली.
दरम्यान, या प्रकरणात मध्यरात्री भाग्यनगर पोलिस ठाण्यात ५५ वर्षीय आरोपी नागेश जाधव याच्या विरोधात पोस्को आणि अॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.