लातूर : प्रतिनिधी
देशपातळीवर गाजलेल्या नीट पेपर लीक प्रकरणी फरार शिक्षकाला टाकळी(टे) ता. माढा येथून अटक केली असून संजय तुकाराम जाधव असे त्याचे नाव आहे. जाधवला नांदेड एटीएसने अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान नांदेड एटीएस विभागाने जलीलखाँ उमरखान पठाण याला यापूर्वी अटक केली आहे.
दरम्यान, वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे पेपर फुटल्या प्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रोज नवे नवे खुलासे पुढे येत आहेत. अशातच या पेपरफुटी प्रकरणी बिहार कनेक्शनसोबतच राज्याचेही कनेक्शन असल्याचे पुढे आले आहे. नांदेड एटीएस पथकाने शनिवारी लातूर येथे दोन ठिकाणी छापेमारी केली असून या पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील जलीलखाँ उमरखान या शिक्षकाला अटक करण्यात आली होती. तर संजय जाधव हा सोलापुरातील माढ्याच्या टाकळी(टे) प्राथमिक शाळेत गेल्या वर्षभरापासून उपशिक्षकाचे काम करत होता. त्याला चौकशी करून सोडल्यावर तो फरार झाला होता. संजय जाधवला टाकळी(टे) ता. माढा येथून अटक करण्यात आली आहे.
नांदेड एटीएस पथकाला लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक संजय तुकाराम जाधव व त्याचा मित्र उपशिक्षक जलीलखा उमरखान पठाण हे दोघे पैसे घेऊन नीट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एटीएसने शुक्रवारी रात्री दोघांना अटक केली होती. तर आणखी काही जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
काही दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षक बदलीमध्ये संजय जाधव याने त्याची पत्नी मनोरुग्ण असल्याचे दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतली होती. दोघेही लातूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करत होते. संजय जाधव हा १५ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळेवर गैरहजर होता. संजय जाधव याने २६ जून २०२३ पासून माढा तालुक्यातील टाकळी प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून काम सुरू केले. त्यापूर्वी तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली देऊळ जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम करत होता. तर २ मे २०२३ रोजी तो टाकळी येथे रुजू झाला होता.
उमरखानला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
या प्रकरणात अटक केलेल्या मुख्याध्यापक जलील खान उमरखान पठाण याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली. तर शिक्षक संजय जाधव याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले, असेही पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलं. या आरोपींनी दिल्लीतील गंगाधर याच्या केलेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशिल पोलिसांच्या हाती लागल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.