सोलापूर : पोलिस कॉन्सेटबलने स्वत:वरच गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे. सोलापूर जिल्हा कारागृह येथे विकास गंगाराम कोळपे या पोलीस कॉन्सेटबलने रायफलने स्वत:च्या छातीत गोळी झाडून घेतली. यानंतर कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विकास गंगाराम कोळपे पुण्याचे रहिवासी असून कामामुळे सोलापूरमध्ये वास्तव्यास आहेत. स्वत:वरच गोळी झाडून घेतल्यानंतर विकास कोळपे जागेवरच कोसळले यानंतर सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेलं, त्यांच्यावर सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयातील उपचारानंतर खासगी रूग्णालयात हलवले.
स्वत:वर गोळी झाडताना विकास कोळपे यांनी व्हॉट्सऍपवर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केला. हे वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचं स्टेटस त्यांनी ठेवलं होतं. भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम, कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे आणि योगेश देसाई यांच्या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळलो आहे.
माझ्या मृत्यूस सर्वस्वी जबाबदार हे दोन कारागृह अधिकारी राहतील यांनी वारंवार माझं मानसिक मनोबल खच्चीकरण केले आहे असे विकास कोळपे यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवलं आणि स्वत:वर गोळी झाडून घेतली. एवढच नाही तर कोळपे यांनी व्हॉट्सऍप स्टेटसवर स्वत:ची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीखही लिहिली. विकास कोळपे यांना आई-वडील, भाऊ, पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. पोलिसाने स्वत:वर गोळी झाडण्याची सोलापूरमधली ही महिन्यातली दुसरी घटना आहे.