बंगळूरू : कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचे प्रकरण समोर आले आहे. एका फार्महाऊसवर केंद्रीय गुन्हे शाखने अचानक धाड टाकली, पण समोरची परिस्थिती पाहून पोलिसही चक्रावले. रेव्ह पार्टीमध्ये कोकेन-ड्रग्ज तर होतेच. पण धक्कादायक बाब म्हणजे, २५ मुलींनाही पार्टीसाठी बोलवले होते. गुन्हे शाखेने १०० जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये २५ मुलींचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, रेव्ह पार्टीमध्ये तेलगु अभिनेत्री हेमा आणि देवरा फेम अभिनेता श्रीकांत याचाही समावेश होता. त्यांना अटक केल्याच्या चर्चा सुरु आहेत. श्रीकांत आणि हेमा यांनी या वृत्ताचं खंडन केले आहे.
बंगळुरू येथील फार्महाऊसवर आयोजित केलेल्या ‘रेव्ह पार्टी’वर केंद्रीय गुन्हे शाखेने छापा टाकला. या छापेमारीत ‘एक्स्टसी’ गोळ्या, कोकेन आणि इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. रेव्ह पार्टीचे दृश्य पाहून गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिसही थक्क झाले होते. फार्महाऊसमधून विचित्र आवाज ऐकू आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने रविवारी पहाटे बंगळुरू येथील इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील एका फार्महाऊसवर छापा टाकला. फार्महाऊसमधून १७ गोळ्या आणि कोकेनसह इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या रेव्ह पार्टीला आंध्र प्रदेश आणि बंंगळुरूमधील १०० हून अधिक लोक उपस्थित होते, त्यात २५ हून अधिक मुलींचा समावेश होता.
रेव्ह पार्टीबाबात पोलिसांनी सांगितले की, १८ मे रोजी सायंकाळी ५ ते १९ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत रेव्ह पार्टी सुरु होती. हैदराबादच्या वासूने वाढदिवस साजरा करण्यासाठी या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये आंध्र प्रदेशच्या आमदाराचा पासही सापडला. याशिवाय १५ हून अधिक आलिशान गाड्याही उभ्या होत्या. एका दिवसात पार्टीवर ५० लाख रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेव्ह पार्टीमध्ये सहभागी असणा-यांमध्ये डीजे, मॉडेल, अभिनेता आणि इतर दिग्गज लोकांचा सहभाग होता. रेव्ह पार्टीमध्ये तेलगू अभिनेत्री हेमा आणि अभिनेत्री श्रीकांतही होता. ज्या फार्महाऊसवर रेव्ह पार्टीचे आयोजन केले, त्याच्या मालकाचे नाव गोपाळ रेड्डी आहे. गुन्हे शाखेने केलेल्या छापेमारीमध्ये फार्म हाऊसजवळ मर्सिडीज-बेंज आणि ऑडीसह १५ पेक्षा जास्त लग्जरी गाड्या जप्त करण्यात आल्यात.