26.4 C
Latur
Sunday, January 12, 2025
Homeलातूरभंडारे यांच्या प्रकाशचित्रांचे सादरीकरण

भंडारे यांच्या प्रकाशचित्रांचे सादरीकरण

स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे आयोजन

लातूर : जागतिक कीर्तीचे प्रकाशचित्रकार, लेखक व दिग्दर्शक संदेश भंडारे यांनी वारी व तमाशा या महाराष्ट्राच्या दोन परंपरांचा जवळून प्रदीर्घ काळ अभ्यास केला. ते ठिकठिकाणी जाऊन निरनिराळ्या भावमुद्रा टिपत गेले. ‘हजार शब्द व्यक्त करू शकत नाहीत ती क्षमता एक प्रकाशचित्र अभिव्यक्त करते,’ ही उक्ती साकार करणारी शेकडो प्रकाशचित्रे भंडारे यांनी टिपली आहेत. त्यातून त्यांची ‘वारी’, ‘तमाशा’ व ‘असाही एक महाराष्ट्र’ ही प्रकाशचित्र पुस्तके प्रसिद्ध झाली व त्यांना देशभरातील कलावंतांची दाद मिळाली.

विख्यात लेखिका महाश्वेता देवी यांच्या कथेवरील ‘म्हादू’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करून भंडारे यांनी आदिवासी म्हादूची भूक आणि शोषण दाखवत वंचित समूहाचे प्रश्न ऐरणीवर आणले. त्यांनी ‘सकाळ’ ‘मिंट’, ‘हिंदुस्थान टाइम्स’, ‘आऊटलुक’ व ‘इंडिया टुडे’ या प्रसिद्ध नियतकालिकांसाठी प्रकाशचित्रं काढली आहेत. कला क्षेत्रातील महनीय कलावंत डॉ. गुलाम मोहम्मद शेख, पं. सत्यशील देशपांडे, डॉ. सुधीर पटवर्धन, अतुल दोडिया, वसंत आबाजी डहाके यांनी भंडारे यांच्या प्रकाशचित्रांची वेळोवेळी वाखाणणी केली आहे. त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशन व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्काराने गौरविलेले आहे.

दि. २७ जानेवारी २०२४ (शनिवार) रोजी संध्याकाळी ५ वाजता, श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या ‘कस्तुर-कंचन सभागृहात’ संदेश भंडारे हे त्यांच्या प्रकाशचित्रांचे सादरीकरण करत त्यावर भाष्य करणार आहेत. त्यावेळी लातूर परिसरातील अनेक हौशी व व्यावसायिक प्रकाशचित्रकारांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी साधता येणार आहे. अशा दर्जेदार कार्यक्रमाचा लातूरकरांनी लाभ घ्यावा, अशी विनंती स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR