जिंतूर / प्रतिनिधी
जिंतूर शहरातील जिंतूर-येलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठमोठी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा रस्ता दुरूस्त करावा अशी वारंवार मागणी करण्यात आलेली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ मंगळवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्डयात नागरिकांनी जेवण करून निषेध नोंदवला.
विशेष म्हणजे या खड्डे जेवणारचे अधिकारी व कर्मचा-यांना निमंत्रण देण्यात आले होते. हे आगळे वेगळे आंदोलन पाहण्यासाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. गांधीगिरी करीत करण्यात आलेल्या या आंदोलनाची दिवसभर जिंतूर शहरात चर्चा होताना दिसून येत होती.
जिंतूर येथून येलदरीमार्गे विदर्भात जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शिवाय परिसरातील अनेक गावात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता अशी अवस्था झाली आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात घडत आहेत. परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्ता दुरावस्थे विरोधात वेळोवेळी गावक-यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्याने त्रस्त झालेल्या येलदरी, शेवडी, माणकेश्वर, केहाळ, आंबरवाडी आदी गावातील नागरिकांनी येलदरी रस्त्यावर दीड हजार खड्डे पूर्ण झाल्याबदल शहरातील प्रमुख कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांना खड्डे जेवणाचे निमंत्रण पत्रिका देऊन मोठ्या खड्ड्याजवळ पंगतीचे आयोजन केले होते.
यावेळी परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला. नागरिकांनी आज गांधिगिरी करीत केलेल्या अनोख्या आंदोलनामुळे रस्त्यांचा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता.