25.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रशहरात आढळला पांढरा विषारी मण्यार दुर्मिळ साप!

शहरात आढळला पांढरा विषारी मण्यार दुर्मिळ साप!

अमरावती : प्रतिनिधी
साप म्हटला की आपल्या मनात, डोळ्यांसमोर काळ्या, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे साप उभे राहतात. सोमवारी कार्सचे सर्पमित्र पवन बघल्ले यांना रेवसा गावात ‘अल्बिनो मण्यार’ हा पांढ-या रंगाचा साप आढळला. अल्बिनिझम हा प्रकार दुर्मिळ असल्यामुळे पवन बघल्ले यांनी त्या सापाची माहिती कार्सचे राघवेंद्र नांदे आणि चेतन भारती यांना दिली.

सर्पतज्ज्ञ राघवेंद्र नांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मण्यार हा साप विषारी असून, तो निशाचर आहे. सरपटणा-या प्राण्यांमधील ‘अल्बिनिझम’ ही एक आनुवंशिक स्थिती आहे, जी उत्परिवर्तन किंवा जनुकीय बदलांमुळे घडते. त्यात मेलेनिन तयार करणारे जीन नसतात. त्यामुळे रंगद्रव्य जे खवल्यांना आणि डोळ्यांना रंग देतात, ते तयार होत नाही.

अल्बिनो साप पिवळे, त्यापैकी काही लाल, गुलाबी किंवा केशरीही असू शकतात. या सापाची नोंद सोमवारी अमरावती वनविभागात करण्यात आली. त्यानंतर वनअधिकारी यांच्या उपस्थितीत या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. आतापर्यंत अमरावतीमध्ये सहा वेळा अल्बिनिझम झालेले साप आढळले आहेत. त्यात प्रत्येकी दिवड, कवड्या एकदा तर नाग आणि तस्कर दोन वेळा आढळले आहेत.

अल्बिनिझम म्हणजे काय?
अल्बिनिझम म्हणजे एक आनुवंशिक स्थिती ज्यामुळे प्राणी किंवा वनस्पतींमध्ये मेलेनिनची कमी किंवा अनुपस्थिती असते. मेलेनिन हे रंगद्रव्य आहे जे त्यांच्या त्वचा, केस आणि डोळ्यांच्या रंगात महत्त्वाची भूमिका निभावते. जेव्हा मेलेनिन तयार करणारे जीन कार्यरत नसतात, तेव्हा रंगद्रव्य तयार होत नाही आणि त्यामुळे अल्बिनो साप पांढरे दिसतात, असे सर्पतज्ज्ञ राघवेंद्र नांदे यांनी माध्यमांना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR