जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे प्रेम प्रकरणातून २८ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रविवारी १९ जानेवारीला सकाळी ९ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सात मारेक-यांना अटक केली आहे.
मुकेश रमेश शिरसाट असे मयत तरुणाचे नाव आहे.
मुकेशने चार ते पाच वर्षांपूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. याचा राग मनात ठेवत गेल्या ४ वर्षांपासून मुलीच्या नातेवाईकांकडून धमक्या आणि त्रास देणं सुरू होते. रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मुकेश शिरसाट आणि मुलीचे नातेवाईक यांच्यात वाद झाला. हा वाद काही वेळाने विकोपाला गेला.
वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडील ८ ते १० जणांनी कोयता व इतर धारदार साहित्यांनी मुकेश शिरसाट याच्यासह त्याच्या नातेवाईकांना वार करून जखमी केले. यामध्ये मुकेश शिरसाटच्या मानेवर गंभीर दुखापत झाली होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एकूण १० जणांपैकी ७ जणांना ताब्यात घेतलं आहे.