लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरापासून जवळच असलेल्या पेठ येथील तावरजा नदीच्या पुलाच्या पाळूलगत एका ७ ते ८ वर्षीय अनोळखी मुलाचा मृतदेह दि. १७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास सापडल्याने एकच खळबळ उडाली. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रात्री आणण्यात आला असून शवविच्छेदनानंतरच या मुलाच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे.
दरम्यान अनोळखी मुलाच्या मृतदेहाबाबत पोलिसांनी सांगितले, सदर मुलाचा मृतदेह तावरजा नदीच्या पाळुलगत होता. रस्त्याची कामे करणा-या मजुरास मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसांना कळवले. सदर मुलगा कुपोषित, आजारी असून या मुलाच्या मृतदेहावर कुठलीही जखम नाही. हा मुलगा बहुतेक बाहेर गावाहून आलेल्या मजुरांचाच असावा. आजाराने मृत्युमुखी पडल्यामुळे तावरजा नदीच्या पाळूलगत ठेवून पालक निघून गेले असावेत. सदर मुलाचा आजाराने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.