30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeराष्ट्रीयनितीशकुमारांना धक्का? ४ आमदार नॉटरिचेबल

नितीशकुमारांना धक्का? ४ आमदार नॉटरिचेबल

पाटणा : वृत्तसंस्था
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय हालचाल निर्माण झाली आहे. सोमवारी बिहारच्या विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून यात बहुमत चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे आरजेडी आणि जेडीयूच्या प्रमुख नेत्यांमध्ये धाकधूक निर्माण झाली आहे. दोन्ही पक्ष आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा करत आहेत. मात्र, सोमवारीच याबाबतचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

संयुक्त जनता दलाने विधिमंडळ नेत्यांची बैठक बोलावली आहे तर राष्ट्रीय जनता दलाचे ७९ आमदार तेजस्वी यादव यांच्या घरी थांबले आहेत. त्यांची सर्व सोय तेथे केली जात आहे. दुसरीकडे काँग्रेसचे १९ आमदार हैदराबादमध्ये आहेत. राज्यात आल्यानंतर त्यांनासुद्धा तेजस्वींच्या घरी थांबण्यास सांगण्यात आले आहे. आरजेडी आपल्या पद्धतीने जोरदार फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे उद्या राज्यात खेला होणार असा दावा केला जात आहे.

जेडीयूच्या विधिमंडळ नेत्यांच्या बैठकीत सर्व ४५ आमदार पोहोचलेले नाहीत. यातील ४ आमदार बैठकीला उपस्थित नाहीत. शिवाय त्यांना फोनदेखील लागत नाही. त्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या आमदारांमध्ये बीमा भारती, सुदर्शन, दिलीप राय आणि रिंकू सिंग यांचा समावेश आहे. याशिवाय आमदार डॉ. संजीव हे देखील बैठकीला आलेले नाहीत. पण सध्या ते पाटण्याच्या बाहेर असून यासंदर्भात त्यांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जेडीयू आमदारांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. दरम्यान, उद्याच्या बहुमत चाचणीकडे देशाचे लक्ष असणार आहे. क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आमदारांना एकजूट ठेवले जात आहे.

बहुमत आपल्या बाजूने असल्याचा दावा
उद्या बहुमत चाचणी असल्याने सर्व आमदारांना वेळेवर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आमदारांनी एकजूटपणा दाखवावा. आकडे आपल्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण बहुमत चाचणी सहज जिंकू यात शंका नाही, असे ते आमदारांना म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR