28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रात दिग्गजांना धक्का?

उत्तर महाराष्ट्रात दिग्गजांना धक्का?

उलटसुलट चर्चेला उधाण एक्झिट पोलचा अंदाजही धक्कादायक

जळगाव : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा पार पडताच शनिवारी रात्री एक्झिट पोलचा अंदाज मांडला गेला. यात राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच एनडीएला बहुमत दाखविले आहे. मात्र, महाराष्ट्रात महायुतीला जबर धक्का बसण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्रात कौल काय असेल, यावरही अंदाज बांधले गेले. यात महायुतीच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रात एकूण ८ लोकसभा मतदारसंघ येतात. प्रत्येक मतदारसंघातील वेगळे चित्र राहिले आहे. यात काही मतदारसंघ खूपच प्रतिष्ठेचे बनविले गेले. त्या पार्श्वभूमीवर प्रचार यंत्रणाही राबविल्या. परंतु प्रत्येक मतदारसंघात वेगळे प्रश्न चर्चिले गेले. त्यातून काही प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, दिंडोरी, जळगाव, नंदुरबार, रावेर, शिर्डी, अहमदनगर, धुळे हे ८ लोकसभा मतदारसंघ येतात.

या प्रत्येक मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरस पाहायला मिळाली.
नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे, ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत झाली तर दिंडोरी लोकसभेत भाजपच्या डॉ. भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढत झाली. या दोन्ही मतदारसंघांत प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली आहे.

कारण विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना यावेळी धक्का बसू शकतो, तर येथे नवा चेहरा ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी होऊ शकतात, असे म्हटले आहे. यासोबतच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार मंत्री राहिलेल्या आहेत. त्यांच्या विरोधात जि. प. चे माजी उपाध्यक्ष भास्कर भगरे यांनी आव्हान उभे केले आहे. या लढतीत भगरे यांचाच विजय होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला. त्यामुळे तोदेखील डॉ. पवार यांना धक्का मानला जात आहे. कारण या मतदारसंघातून भगरे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनी कांद्याच्या प्रश्नावरून डॉ. भारती पवार यांना कोंडीत पकडले होते.

जळगाव लोकसभेत भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार, नंदुरबारमध्ये भाजपच्या हीना गावित विरुद्ध काँग्रेसचे गोवाल पाडवी, रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली. मात्र, येथे भाजपलाच फायदा होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. जळगावात भाजपच्या स्मिता वाघ नवा चेहरा आहेत. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाने जोर लावला. परंतु स्मिता वाघ विजयी होण्याची शक्यता वर्तवली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात लढत झाली. यात काँग्रेसने एक तर उशिरा उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर पक्षांतर्गत त्यांनाच विरोध झाला. त्यामुळे त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. याचा फायदा भाजप उमेदवार सुभाष भामरे यांना होऊ शकतो, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

शिर्डी, नगरमध्ये विद्यमान
खासदारांना धक्का?
शिर्डी लोकसभेत शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, अहमदनगरमध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात लढत झाली. सदाशिव लोखंडे आणि सुजय विखे विद्यमान खासदार आहेत. त्यांना आता अनुक्रमे भाऊसाहेब वाकचौरे आणि निलेश लंके धक्का देऊ शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे निकालही धक्कादायक असू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR