अहमदपूर (जि. लातूर) : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर (क्रमांक ३६१) असलेला दिशादर्शक फलक कोसळला. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर इतर दोन वाहनांचेही नुकसान झाले आहे. ही घटना अहमदपूर – शिरूर ताजबंददरम्यान महादेववाडी येथे शनिवारी सायंकाळी घडली.
अहमदपूर ते शिरूर ताजबंद मार्गावरील महादेववाडी पाटीनजीक नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे दिशादर्शक फलक कोळसला. यामध्ये अहमदपूरकडून शिरूर ताजबंदकडे ज्ञानेश्वर बालाजी साके (वय २९, रा. आष्टा ता. चाकूर) हा दुचाकीवरुन (एम.एच २० बी.एच. ७७०१) निघाला होता. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला दिशादर्शक फलक अचानक कोसळला.
यामध्ये दुचाकीस्वार ज्ञानेश्वर साके हा जागीच ठार झाला. त्याचबरोबर शिरूर ताजबंदकडे निघालेल्या एका महिंद्रा बोलेरो जिप आणि कारचेही नुकसान झाले. याबाबत अहमदपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मयत ज्ञानेश्वर बालाजी साके यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली आहेत.
ज्ञानेश्वर साके उत्तम मृदंग वादक
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महमार्गावरील दिशार्शक फलक कोसळून ठार झालेल्या ज्ञानेश्वर साके हा युवक उत्तम मृदंगवादक होता. तो वारकरी सांप्रदायातील असल्याने भजन-किर्तन करत होते. ते अहमदपूरकडून गावाकडे निघाले असता ही घटना घडली.