परभणी : बीड जिल्ह्यातील मास्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली असून पीडीत कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी दि.४ जानेवारी रोजी शहरात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात रविवार, दि.२९ रोजी सर्व मराठा संघटना, सकल मराठा समाज, सर्व पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, सर्व जाती धर्मातील लोकांची बैठक हॉटेल अतिथी येथे पार पडली. यावेळी बीड जिल्ह्यातील या घटनेचा सर्वांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात तातडीने चालवण्यात यावे. सर्व आरोपीवर मोक्कांतर्गत कारवाई करावी. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या प्रकरणांमध्ये जेष्ठ विधीज्ञ यांची नियुक्ती व्हावी. हे प्रकरण बीड येथे न चालविता मुंबई येथे चालवावे अशी मागणी एक मताने सर्व मराठा संघटनांनी, सकल मराठा समाज व सर्व पक्षांनी केली आहे.
यासाठी दि.४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नूतन महाविद्यालय येथून शिवाजी चौक, गांधी पार्क मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पर्यंत मूक मोर्चा निघणार आहे व त्याचे रूपांतर उपोषण मैदान येथे सभेत होणार आहे. या मोर्चात स्व. संतोष देशमुख यांचे कुटुंब उपस्थित राहणार आहे. १ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय बैठक परभणीमध्ये होणार आहे. सर्व बांधवांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.