सोलापूर : राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३५ ते ३६ जागांवर महाविकास आघाडीतील पक्षांचे एकमत झाले आहे. उर्वरीत जागांसंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यावरही लवकरच तोडगा निघेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना सांगितले.
पवार हे शुक्रवारी रात्री सोलापुरात मुक्कामी आले होते. त्यांनी आज (ता. २० जानेवारी) सकाळी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागांसंदर्भात सकारात्मक बोलणी सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेनेकडून संजय राऊत व इतर नेते आहेत. हे लोक लोकसभेच्या जागांसंदर्भात बोलणी करत आहेत. मी स्वतः यामध्ये सामील नसलो तरी मला आमच्या नेत्यांनी रिपोर्टिंग केले आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीमध्ये आम्ही डाव्यांनाही सोबत घेणार आहेत. त्यात शेतकरी कामगार पक्षाचाही समावेश असणार आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडीलाही आम्ही आमच्यासोबत घेणार आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझे आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे झाले आहे. आंबेडकरांना आघाडीत घेण्याचा आमचा विचार पक्का आहे. त्यासंबंधी लवकरच निर्णय होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
सोलापूरची जागा राष्ट्रवादीला घेण्याबाबत आज आम्ही सांगू शकत नाही. कारण, तशी चर्चा अजून झालेली नाही. जिल्ह्यात आम्हाला संधी आहे, असं वाटतं. पण, आघाडीला त्रास होईल, असे आम्ही काही करणार नाही, असेही शरद पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना स्पष्ट केले. ईडीची नोटीस अनेकांना आली. रोहित पवार, संजय राऊत, अनिल देशमुख यांनाही आली होती. देशमुख यांच्यावर शंभर कोटींचे आरोप झाले होते. मात्र, त्यांच्या प्रकरणात न्यायालयाने ताशेरे ओढून देशमुखांना सोडून दिले. मात्र, गृहमंत्री असलेल्या माणसाला तुरुंगात जावे लागले. संजय राऊत यांनी सरकारविरोधात लिहिले; त्याचा राग धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मलाही नोटीस आली होती. दर आठवड्याला ईडीची कोणाला तरी नोटीस येतेच, असे पवार यांनी रोहित पवार यांना आलेल्या ईडी नोटिशीबाबत सांगितले.
पवार म्हणाले, सरकारच्या विचारांशी सहमत नसलेल्या घटकांना नाउमेद आणि दहशत निर्माण करण्याचे काम सत्ताधारी मंडळी करत आहेत. रोहित पवार यांना आलेली नोटीस त्यातूनच आलेली आहे. त्यामुळे चिंता करण्याचे काही काम नाही. हा प्रश्न रोहित पवारांसोबत इतरांचाही आहे. पण, त्याविरोधात कोर्टात लढणं आणि वास्तव त्या ठिकाणी मांडणं, हे काम आमच्याकडून केले जाईल. वेगळी मतं मांडणाऱ्यांच्या विरोधात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर केला जात आहे. मागच्या काळात आम्ही केंद्र सरकारमध्ये होतो. मात्र, त्यावेळी आम्हालाही ईडी माहितीही नव्हती. मात्र, त्या विरोधात लोकांमध्ये जावे लागेल आणि या प्रवृत्तीला विरोध करावा लागेल असेही पवार यांनी स्पष्ट केले.