कोलकाता : वृत्तसंस्था
महिलांवरील वाढते अत्याचार ही चिंताजनक बाब आहे. देशभरात रोज सुमारे ९० बलात्काराच्या घटना नोंदवल्या जातात. देशासाठी हे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे बलात्काराच्या घटनांच्या विरोधात आता कठोर कायद्याची गरज आहे. अशा प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी सुनावणी ५ दिवसांत व्हायला हवी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.
कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका निवासी डॉक्टर महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी यांना पत्र लिहून कठोर कायदा करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले. या पत्रात ममता बॅनर्जी यांनी बलात्कारांच्या घटनांच्या विरोधात कठोर कायदा करण्याची मागणी केली. तसेच देशभरात दररोज सुमारे ९० बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात आहेत. अशा प्रकराच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी सुनावणी १५ दिवसांत पूर्ण व्हायला हवी, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले पत्रात म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांनी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात
मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे की, देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार अनेक प्रकरणांमध्ये बलात्कार आणि त्यानंतर निर्घृण हत्येच्या घटना समोर येत आहेत. देशभरात रोज सुमारे ९० बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राष्ट्राचा आत्मविश्वास डगमगतो. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी हे थांबविणे हेच सर्वांचे कर्तव्य आहे. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्रीय कायद्याद्वारे अशा संवेदनशील मुद्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे म्हटले.
कोलकाता येथील आर.जी कर महाविद्यालय आणि रुग्णालयात एका डॉक्टरची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याआधी तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात आहे. या घटनेवरून देशभरातील डॉक्टर हे त्यांच्या सुरक्षेच्या मुद्यावर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमध्ये अनेक नवे पैलू रोज समोर येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी संजय रॉयला अटक केलेली आहे.
लवकरात लवकर सुनावणी होणे गरजेचे
बलात्कारासारख्या गंभीर घटनांमध्ये लवकरात लवकर सुनावणी होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी विशेष न्यायालयेदेखील स्थापन करण्याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकरणात न्याय लवकर मिळेल. याबरोबरच अशा प्रकरणांची सुनावणी १५ दिवसांत पूर्ण व्हायला हवी, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.