जालना : शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची गुरूवार दि. ५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. यावेळी दोघांमध्ये बंद दरवाजा आड सुमारे ३ तास चर्चा झाली. दरम्यान झालेल्या या चर्चेमुळे राज्यात उलटसुलट चर्चेला मात्र उधान आल्याचे दिसून आले. सत्तार आणि जरांगे यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
आज मुंबईत मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार होती. या बैठकीत मराठा आरक्षण आणि शेतक-यांचे प्रश्नांवर चर्चा केली जाणार होती. त्यामुळे आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना किती रुपये नुकसान भरपाई मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मंत्री सत्तार यांच्या सोबतच फुलंब्री मतदार संघातून इच्छुक असलेले किशोर बलांडे यांनीही जरांगेंची भेट घेतली. या दोघांमध्ये राज्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.
तसेच मराठा आरक्षण आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईबाबत चर्चा झाल्याचे सत्तार यांनी सांगितले. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना कळवतो, असे जरांगे यांना सांगितल्याचे सत्तार यांनी सांगितले. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात जे बोलणे झाले आहे, त्यानुसार मुख्यमंत्री कार्यवाही करतील, असेही सत्तार यांनी म्हटले आहे. शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, मात्र शेतक-यांचे नुकसान लाखोंचे झाले आहे आणि भरपाई हजारांची दिली, असे होता कामा नये, असे जरांगे म्हणाले. जरांगे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. यानंतर अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली. तसेच मराठा आरक्षणाचा विषय तात्काळ मार्गी लावावा, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्दा अजूनही प्रलंबित
मराठा आरक्षणाच्या मुद्दा अजूनही प्रलंबित असून त्यावर तोडगा काढावा. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतक-यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतक-यांची उभी पिके जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांच्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत, त्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळावी, असेही मनोज जरांगे यांनी अब्दुल सत्तार यांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
यानंतर अब्दुल सत्तार यांनी या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन चर्चा केली. तसचे यावर लवकरात लवकर तोडगा काढू, असे आश्वासनही अब्दुल सत्तार यांनी दिले. सरकारकडे आता केवळ ६० दिवस उरले आहेत. त्यामुळे आज मी स्वत: शेतक-यांची नुकसान भरपाई आणि आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी बोलणार आहे. तसेच आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा केली जाईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.