22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशमधील १४ पैकी ६ मतदारसंघांत होणार चुरशीची लढत

उत्तर प्रदेशमधील १४ पैकी ६ मतदारसंघांत होणार चुरशीची लढत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून आता सहाव्या टप्प्यातील १४ जागांसाठी प्रचार तीव्र झाला आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये आठ वेळा खासदार राहिलेल्या मनेका गांधी, धर्मेंद्र यादव, दिनेश लाल यादव निरहुआ, जगदंबिका पाल आणि लालजी वर्मा यांच्या नावांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यात सुलतानपूर, प्रतापगड, फुलपूर, अलाहाबाद, आंबेडकर नगर, श्रावस्ती, डुमरियागंज, बस्ती, संत कबीर नगर, लालगंज, आझमगढ, जौनपूर, मच्छिलिशहर, भदोही या १४ जागांवर मतदान होणार असून एकूण १६२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर अनेक जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळत आहे, या मतदारसंघात २५ मे रोजी मतदान पार पडणार आहे.

या मतदारसंघात होणार चुरशीची लढत
सुलतानपूर
भाजपने सुलतानपूरमधून विद्यमान खासदार मनेका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. मनेका गांधी आठ वेळा खासदार झाल्या आहेत. यावेळी त्या नवव्यांदा संसदेत पोहोचण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. मनेका गांधी यांच्याविरोधात सपाकडून रामभुआल निषाद आणि बसपकडून उदराज वर्मा रिंगणात आहेत.

प्रतापगड
उत्तर प्रदेशमधील प्रतापगड लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. या मतदारसंघात कुंडाचे आमदार राजा भैय्या यांचा प्रभाव असल्याचे बोलले जाते. राजा भैय्या कोणाच्या बाजूने उभे राहतील त्या उमेदवाराला प्रतापगडमध्ये विजय मिळणे सोपे जाते. भाजपने यावेळी विद्यमान खासदार संगम लाल गुप्ता यांना उमेदवारी दिली. तर सपाकडून एस. पी. सिंग पटेल निवडणूक लढवत आहेत.

अलाहाबाद
यावेळीही अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून सपा आणि भाजपमध्ये रंजक लढत पहावयास मिळत आहे. भाजपने येथून नीरज त्रिपाठी आणि बसपाने उज्ज्वल रमण सिंह यांना तिकिट दिले आहे. या दोन्ही उमेदवारांकडून कौटुंबिक वारशाच्या नावाखाली जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आंबेडकर नगर
आंबेडकर नगरमध्ये यावेळी भाजपने बसपामधून आलेले रितेश पांडे यांना उमेदवारी दिली आहे. तर सपाचे लालजी वर्मा हे इंडिया अलायन्सकडून निवडणूक लढवत असून, बसपाने यावेळी या मतदारसंघात मुस्लिम उमेदवारावर भरोसा टाकला आहे. मोहम्मद कलाम शाह यांना बसपने उमेदवारी दिली आहे.

आझमगड
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी २०१९ मध्ये आझमगड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. यानंतर अखिलेश यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भोजपुरी अभिनेता-गायक दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. निरहुआ यांनी अखिलेश यादव यांचे चुलत भाऊ धर्मेंद्र यादव यांचा पराभव केला होता.

श्रावस्ती
श्रावस्ती लोकसभा मतदारसंघातून भाजपने श्री रामजन्मभूमी मंदिर समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांचा मुलगा साकेत मिश्रा यांना तिकिट दिले आहे. त्यांची लढत सपाचे रामशिरोमणी वर्मा यांच्याशी होणार असून राम शिरोमणी हे २०१९ मध्ये सपा-बसपा युतीचे विद्यमान खासदार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR