मुंबई : प्रतिनिधी
निधी उपलब्धतेच्या अभावी आर्थिक कोंडीत सापडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई इलाखा शहर विभागाने निविदा प्रक्रिया, कार्यादेश या प्रक्रियेला फाटा देत मंत्रालयातील मंत्री दालनांच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निविदा न मागवता सुरू केलेल्या या कामाला कार्योत्तर मंजूर करून घेण्याचा घाट बांधकाम विभागाने घातला असून मंत्रालयातील दालनांप्रमाणे मंत्र्यांचे बंगलेही सजवले जात आहेत.
मुंबई इलाखा शहर विभागाने एकाचवेळी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयासह १० ते १२ मंत्री दालनांचे काम हाती घेतले आहे. याशिवाय मंत्रालय विस्तारित इमारतीत कृषी खात्याच्या कार्यालयाचा कायापालट करण्यात येत आहे. मंत्रालय मुख्य इमारतीच्या चौथ्या मजल्यावर विशेष दालनाचे काम सुरू आहे. सातव्या मजल्यावर दोन राज्यमंत्र्यांना दालने देण्यात आली आहेत. या दालनांची कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे मंत्रालयाला अक्षरश: फर्निचर कारखान्याचे स्वरूप आले आहे.
पाच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सचिवांचे दालन देण्यात आले होते. या दालनाच्या सजावटीवर तेव्हा काही कोटी रुपयांचा खर्च झाला होता. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दालनाचे वाटप झाले असून बांधकाम विभागाने पुन्हा नव्याने या दालनाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. या दालनात नवीन वातानुकूलित यंत्रणा तसेच किमती फर्निचर बसवले जाणार आहे.
याशिवाय मंत्री कार्यालयाला नवीन फर्निचर, खुर्च्या पुरवल्या जाणार आहेत. मंत्री दालनांचे नूतनीकरण आणि इतर साहित्य पुरवठा यावर १२ ते १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
आर्थिक अनागोंदीमुळे कायम चर्चेत असलेल्या मुंबई शहर इलाखा विभागाला गेले वर्षभर राज्य सरकारकडून पुरेसा निधी देण्यात आला नाही. सरकारकडून निधी वितरीत न झाल्याने दक्षिण मुंबईतील शासकीय इमारती, अधिकारी-कर्मचा-यांची निवासस्थाने येथे रंगरंगोटी, देखभाल दुरुस्तीची कामे केलेल्या कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके थकित आहेत. ही देयके न मिळाल्याने कंत्राटदारांनी गेल्या वर्षी काम बंद आंदोलन केले.
मंत्र्यांची दालने चकचकीत
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आदी मंत्र्यांची दालने चकचकीत केली जात आहेत.
प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल : पाटसकर
दरम्यान, बांधकाम विभाग इलाखाच्या अधिका-यांकडून सांगितले की, मंत्रालयातील मंत्री दालनाच्या नूतनीकरणासाठी संबंधित कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. मात्र शासनाकडून विभागाला निधी मिळत नसल्याने मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याची कामे हाती घेणे विभागाला जिकिरीचे बनले आहे.