पुणे : राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या २० हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक असून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. ही अट जानेवारीअखेर देण्यात येणा-या १९ व्या हप्त्याला लागू नसेल.
त्यापूर्वी सध्या नवीन नोंदणी करणा-या शेतक-यांना पती पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या अटीमुळे एका पात्र कुटुंबात एकालाच लाभ देण्याची अंमलबजावणी होणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या ९६ लाख ६७ हजार इतकी आहे. त्यात भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या ९५ लाख ९५ हजार इतकी असून अजूनही ७८ हजार लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. तर ई केवायसी प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या ९५ लाख १६ हजार इतकी आहे.
तर अजूनही १ लाख ८९ हजार शेतक-यांनी ई केवायसी पूर्ण केलेले नाही. बॅँक खात्याशी आधार संलग्न करणा-या लाभार्थ्यांची संख्या ९४ लाख ५५ हजार असून अद्याप १ लाख ९८ हजार शेतक-यांनी ही अट पूर्ण केलेली नाही. तसेच अर्जाला स्वयंमान्यता न दिलेल्यांची संख्या सुमारे ३६ हजार आहे. त्यामुळेच योजनेच्या १९ हप्त्यांसाठी राज्यातील ९२ लाख ४२ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. येत्या २५ जानेवारीनंतर महिनाअखेर हा हप्ता शेतक-यांना देण्यात येणार आहे.
…तर योजनेचा लाभ नाही
राज्य सरकारने डिसेंबरमध्ये अॅग्रीस्टॅक योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत शेतक-यांना स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार आहे. यासह शेतकरी असल्याचा पुरावा देऊन त्याची जोडणी अधिकार अभिलेखालाही करण्यात येणार आहे. हे करताना शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांकही जोडले जाणार आहेत. ही योजना कृषी सहायक, तलाठी तसेच ग्रामसेवक यांच्या समन्वयातून राबविली जाणार आहे. सध्या यावर या तिन्ही कर्मचारी संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे योजना प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार जोडणी व शेतकरी ओळख क्रमांकाशिवाय पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही.
२० व्या हप्त्यासाठी अट बंधनकारक
योजनेच्या १९ व्या हप्त्यासाठी ही अट लागू नाही. मात्र, २० हप्त्यांसाठी या बाबी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अटीची अंमलबजावणी करण्यापूर्वी नवीन नोंदणी करणा-या शेतक-यांनाही आता पती, पत्नीच्या आधार क्रमांकासह कुटुंबातील १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सदस्यांची आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कुुटुंबातील एकाच सदस्याला लाभ देण्यात येणार आहे.