पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि मंत्री शंभुराज देसाई यांच्यात चांगलीच जुंपली. गुटखा, सिगारेट यावर बंदी घालण्याचे काम केल्े पाहिजे तर शंभुराज देसाई स्वत:च सभागृहात तंबाखू चोळत असतात. त्यांच्या वर्मावर बोट ठेवलं तर मी तुमच्यावर अब्रुनुकसानीचा दावा टाकेल, अशी धमकी देत आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतात, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी मंत्री देसाई यांच्यावर केला आहे.
पुण्यातले बेकायदेशीर पब आणि बारविरोधात पुण्यात केलेल्या आंदोलनानंतर राज्य शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागावर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यासह रवींद्र धंगेकर यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. दरम्यान, या नोटिसीवर सुषमा अंधारे यांनी आज उत्तर दिले आहे. मी असल्या कुठल्याही धमक्यांना भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी शंभुराज देसाई यांनी पाठवलेल्या नोटिसीवर दिली आहे.
धमक्यांना भीक घालणार नाही -सुषमा अंधारे
अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा करून तुम्ही सुषमा अंधारेचा आवाज बंद करू शकणार नाही. तुमच्या कुठल्याही दाव्यांना आणि धमक्यांना भीक न घालता माझी लढाई चालू ठेवणार आहे, असा पलटवारही आंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर केला आहे, पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण घडल्यापासून अंधारे आणि आमदार धंगेकर सातत्याने पुणेकरांच्या वतीने सरकारवर हल्ला करत आहेत.