पुणे : शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावाने ओळखले जाणारे पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचे पाहायला मिळाले. त्यात सगळ्याच प्रकारचे गुन्हे आले. मात्र यातही बलात्काराची आकडेवारी पाहिली तर अनेकांच्या भुवया उंचावणार आहे. पुण्यात मागील तीन वर्षात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यंदा २०२३ मध्ये तब्बल ३९४ बलात्काराचे गुन्हे समोर आले आहेत. ही आकडेवारी पाहून पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येते.
पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्याची लोकसंख्या वाढत आहे. राज्यभरातूनच नाही तर देशभरातून पुण्यात अनेक कुटुंबच्या कुटुंब स्थायिक होत आहेत. त्यासोबत पुण्यात शिक्षणासाठी येणा-या तरुणांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे परिणामी गुन्हेगारीदेखील वाढत आहे, असे म्हटले तरी हरकत नाही. पुण्यात वर्षभरात ३९४ गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच किमान दिवसाला एका महिलेवरकिंवा मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. हा आकडा खरंतर प्रचंड धडकी भरवणारा आहे.
बहुतांश प्रकरणात आरोपी हे पीडित महिलांच्या परिचयाचे आहेत. अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रमाणदेखील मोठे आहे. यामध्ये समाजमाध्यमावरून ओळख करून मैत्री करून झालेले बलात्कार, लग्नाचे आमिष दाखवून झालेले बलात्कार आहेत. अल्पवयीन मुलींना फूस लावून प्रेमाच्या जाळयÞात ओढून त्यांच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केलेल्याचे अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिव्ह ईनमध्ये राहत असलेल्यानी वादावादात केलेल्या आरोपांमुळेदेखील बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यामुळे या ३९४ गुन्ह्यांमध्ये सगळ्या कारणांनी केलेले गुन्हे आहेत. २०२१ मध्ये २९७, २०२२ मध्ये ३५७ गुन्ह्यांची नोंद आहे.