30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्र१ कोटी लाडक्या बहिणींची खाती अद्याप रिकामीच!

१ कोटी लाडक्या बहिणींची खाती अद्याप रिकामीच!

पुणे : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी सात लाख महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी राज्यातील एक कोटी १० लाख महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये मिळाले असून आणखी ९७ लाख महिला रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. योजनेसाठी सर्वाधिक १५ लाख अर्ज पुणे जिल्ह्यातील असून त्यानंतर नाशिक, नगर, ठाणे, सोलापूर या जिल्ह्यांतूनही जास्त अर्ज आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्वांत कमी एक लाख ८५ हजार महिलांनीच योजनेसाठी अर्ज केले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील बहुतेक घरापर्यंत महायुती सरकारचा प्रचार व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाच्या योजनांसाठी आता ५० हजार योजनादूत नेमले जात आहेत. त्यासाठी त्यांना दरमहा १० हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. दुसरीकडे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये वचनपूर्तीचे मेळावे देखील घेतले जात आहेत.

विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी किमान १५ ते २० जिल्ह्यांमध्ये महामेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत सध्यातरी ३१ ऑगस्टपर्यंतच आहे, पण ती मुदत आणखी १५ दिवस वाढू शकते. कारण, राज्यातील एकही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अभ्यास करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला फोकस करून राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये वचनपूर्तीचे मेळावे घेतले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आवर्जून उपस्थिती आहे. ३१ ऑगस्ट रोजी मोठा मेळावा नागपूरला होणार असून त्यानंतर १ सप्टेंबर रोजी सोलापुरात असाच मेळावा होणार आहे. शहराच्या ठिकाणी होणा-या या मेळाव्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडील बस भाड्याने घेतल्या जात आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत दोन कोटी सहा लाख ८९ हजार ३४७ महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी एक कोटी ५९ लाख ४१ हजार ८५६ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक १५ लाख, नाशिक जिल्ह्यातून पावणेबारा लाख, नगर जिल्ह्यातून दहा लाख पाच हजार, ठाण्यातून नऊ लाख ३२ हजार, सोलापूरमधून आठ लाख ९२ हजार आणि छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांतून प्रत्येकी आठ लाखांवर, नांदेड, सातारा, मुंबई येथून प्रत्येकी साडेसहा ते सात लाखांपर्यंत अर्ज आहेत. सर्वांत कमी अर्ज सिंधुदुर्ग (एक लाख ८६ हजार), गडचिरोली (दोन लाख २८ हजार), बुलडाणा (दोन लाख ६९ हजार), हिंगोली (दोन लाख ७३ हजार), मुंबई शहर (दोन लाख ९२ हजार), वर्धा व वाशिम जिल्ह्यातून प्रत्येकी पावणेतीन लाख अर्ज आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR