24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूरपणन कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करू

पणन कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करू

सोलापूर : कांदा असो की कोणताही शेतमाल विकल्यावर जागेवर पैसे देणे अपेक्षित आहे. याशिवाय पणन कायद्यानुसार जास्तीत जास्त सात दिवसांच्या मुदतीत त्या शेतमालाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना अदा करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याची तक्रार आल्यास त्या व्यापाऱ्यावर किंवा खरेदीदारावर कारवाई केली जाईल.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी अडीचशे ते पावणेतीनशे गाड्या कांदा आवक आहे. याठिकाणी कांद्याला प्रतिक्विंटल दीड हजार रुपये ते पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सोलापूरसह परजिल्ह्यातून, कर्नाटकातून येथे कांदा विक्रीसाठी येत आहे. मात्र, २० हजार रुपयांहून अधिक कांदापट्टी झाल्यास पुढील रकमेसाठी १५ दिवसांची मुदत टाकून धनादेश दिला जातोय. पणन कायद्यात अशी कोणतीही तरतूद नसताना देखील बाजार समितीत असा प्रकार खुलेआम सुरु असल्याची वस्तुस्थिती आहे.

सोलापूर बाजार समितीत सध्या नगर, पुणे, धाराशिव, कोल्हापूर, सातारा (फलटण, म्हसवड), सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, उत्तर सोलापूर, करमाळा, दक्षिण सोलापूर, मोहोळ येथून कांदा विक्रीसाठी येत आहे. याशिवाय कर्नाटकातील कलबुर्गी, बागलकोट, मुधोळ, विजयपूर येथूनही कांदा विक्रीसाठी सोलापुरात येतोय. कांदा खरेदीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांसह आंध्रप्रदेश, तेलंगण, तमिळनाडू, बंगळूर येथील व्यापारी सोलापुरात येतात. यंदा पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला असल्याने पुढील महिन्यात कांद्याचा दर वधारलेला असणार आहे.

यंदा सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३२ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. हजारो रुपयांचा खर्च करून जतन केलेला कांदा बाजारात विकल्यावर रोखीने किंवा जागेवरच पैसे मिळावेत, अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे. जेणेकरून सर्वच मजुरांचे, खते-औषधांचे पैसे देता येतील हा त्यामागील हेतू आहे. पण, येथे २० हजारांपर्यंत रोखीने पैसे मिळतात आणि उर्वरित रकमेचा धनादेश तोही १५ दिवसांची मुदत टाकलेला दिला जातो. याकडे बाजार समितीचे प्रशासक किंवा जिल्हा उपनिबंधकांनी लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत २२८ गाड्या कांद्याची आवक होती. पावसात भिजलेला कांदा प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये दराने विकला गेला. नवीन कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत भाव होता. जुन्या कांद्याला चार हजार ते पाच हजार २५० रुपयांपर्यंत दर मिळाला.

सध्या आंध्रप्रदेश, तेलंगण या राज्यात कांदा उत्पादन सुरु असून तेथील लिलावामुळे सोलापूर बाजार समितीत अजूनही व्यापाऱ्यांची (खरेदीदार) अपेक्षित संख्या नसल्याचे चित्र आहे. तरीदेखील नवीन, जुन्या कांद्याला समाधानकारक भाव असल्याचे शेतकऱ्यांना समाधान आहे. नोव्हेंबरमध्ये सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दर वाढेल, असा विश्वास बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR