मुंबई : शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्रानुसार सध्या राज्यातील राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीपासून याच समिकरणाचा वापर दोन्ही बाजूंनी केला जात आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत नाराज असलेल्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश दिला जात आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराजांना शिंदे आपल्या पक्षात घेत आहेत. अशातच आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणा-या व्यक्तीचे कौतुक करत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर केला आहे.
मुंबईतील साकीनाका येथील सभा संपवून ९० फूट रस्त्यावरून जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. हा ताफा संतोष कटके नावाच्या व्यक्तीने हातात काळा झेंडा घेऊन हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे स्वत: रस्त्यावर उतरले होते. या घटनेमुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेचा व्हीडीओ व्हायरल होताच त्याची दखल खुद्द ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. ठाकरेंनी या संतोष कटके आणि त्यांचे वडील साधू कटके यांना ‘मातोश्री’वर बोलवून त्यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे.
त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले म्हणून उद्धव ठाकरेंनी संतोष कटकेंचे कौतुक केल्यामुळे शिंदेंचा विरोधक तो आपला मित्र हे सूत्र ठाकरेंनी अवलंबले असल्याचे बोलले जात आहे.